ध्वनीप्रदूषणाच्या ६२, तर आग लागण्याच्या १७ घटनांची नोंद
Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 नरकचतुर्दशी Narakchaturdashi
पणजी, १२ नोव्हेंबर (वार्ता.) : राज्यात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नरकासुरदहन प्रथा प्रचलित आहे. या प्रथेच्या अंतर्गत यंदाही ध्वनीप्रदूषण होऊन त्याचा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना फटका बसला आहे. राज्यभरात ध्वनीप्रदूषणाची एकूण ६२ प्रकरणे नोंद झालेली आहेत, तर ठिकठिकाणी आग लागण्याच्या १७ घटना घडल्या आहेत. कुडचडे येथे नरकासुर प्रतिमास्पर्धेला आणलेल्या एका प्रतिमेला स्पर्धेच्या वेळीच आग लागली आणि यामुळे तेथे एकच तारांबळ उडाली.
गोव्यात नरकासुर प्रतिमादहन प्रथेच्या अंतर्गत नरकासुराच्या मोठ मोठ्या प्रतिमा बनवून रात्रभर ढोलताशे वाजवून नाच केला जातो. दीपावलीच्या पहाटे श्रीकृष्णाच्या हस्ते नरकासुराचा वध केला जातो. मोजकेच लोकप्रतिनिधी वगळता अनेक जण अशा नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी देणग्या देत असतात.
(सौजन्य : In Goa 24×7)
अशा देणग्यांमुळे हल्ली या प्रथेमुळे रात्रभर ‘डिजे’ (मोठ्या ध्वनीक्षेपकावर लावलेले संगीत) लावून नाच करण्याचा प्रकार होत असतो. लोकवस्तीमध्ये कानठळ्या बसणारे ‘डिजे’ लावल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत आहे. ज्यांना ध्वनीप्रदूषण सहन होत नाही त्यांनी एका रात्रीसाठी इतरत्र जाऊन रहाणे पसंत केले. ज्यांना इतरत्र जाणे शक्य नाही, त्यांनी पोलिसांकडे ध्वनीप्रदूषणाची तक्रार नोंदवली.
(सौजन्य : In Goa 24×7)
ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे सांगूनही ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण नाही
नरकासुर प्रतिमा स्पर्धा होण्याच्या आदल्या दिवशी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा पोलीस आणि तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार बहाल केल्याची माहिती दिली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनी मोजण्यासाठी यंत्रे दिल्याचे सांगितले होते. हे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते; मात्र प्रत्यक्षात ध्वनीप्रदूषण नेहमीप्रमाणे झालेच !