बांगलादेश सीमेच्‍या रक्षणासाठी मधमाशांचा वापर करण्‍याचा सीमा सुरक्षा दलाचा अनोखा प्रयोग !

१. बांगलादेश सीमेवरील घुसखोरी आणि गुन्‍हेगारी थांबवण्‍यासाठी सीमा सुरक्षा दलाचा प्रयोग किती लाभदायक ?

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘बांगलादेश सीमेचे रक्षण करणारे सीमा सुरक्षा दल (बी.एस्.एफ्.) तेथे होणारी घुसखोरी, विविध प्रकारची तस्‍करी आदी गुन्‍हे थांबण्‍यासाठी एक वेगळा प्रयोग करण्‍याच्‍या प्रयत्नात आहे, अशी बातमी आहे. कुंपण असलेल्‍या ठिकाणी मधमाशांची पोळी लावायची. त्‍या तेथे फिरत रहातील आणि कुणी कुंपण तोडून भारताच्‍या हद्दीत प्रवेश करण्‍याचा प्रयत्न केला, तर त्‍या त्‍याच्‍यावर आक्रमण करतील. त्‍यामुळे तेथे होणारी गुन्‍हेगारी किंवा तस्‍करी यांना काही प्रमाणात आळा बसेल. हा प्रयोग वेगळ्‍या प्रकारचा असला, तरी तो वाटतो तेवढा सोपा नाही; कारण अनेक वेळा कुंपण हलते. तेथे कोल्‍हे, लांडगे यांसारखी लहान जनावरे फिरत असतात. काही वेळा वादळानेही कुंपण हालत असते. असे झाले, तर मधमाशा येऊन आक्रमण करतील. अर्थात् हे आक्रमण तेथे रहाणार्‍या भारतीय सैनिकांवरच होऊ शकते. त्‍यामुळे हा प्रयोग लाभदायक तसा हानीकारकही आहे.

२. बांगलादेश सीमेवरील कारवाया थांबवण्‍यासाठी ‘बी.एस्.एफ्.’ला अधिक चांगले काम करणे आवश्‍यक !

त्‍यामुळे ‘अशा प्रकारे सीमेवर मधमाशांचे पोळे लावून घुसखोरी किंवा गुन्‍हे थांबतील का ?’, या प्रश्‍नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. त्‍यासाठी ‘बी.एस्.एफ्.’ला चांगले काम करावे लागेल. भारतात ५ ते ६ कोटी लोकांनी घुसखोरी केली आहे. त्‍यांना थांबवण्‍यात भारताच्‍या ‘बी.एस्.एफ्.’ला अपयश आले आहे. प्रतिवर्षी भाकड जनावरांची सहस्रो कोटी रुपयांची तस्‍करी बांगलादेशात केली जाते. बांगलादेशात मांसाची किंमत भारताहून ३-४ पट अधिक आहे. याखेरीज कापड, सोने, बनावट चलन इत्‍यादी गोष्‍टींची तस्‍करी केली जाते. तेथे असणार्‍या ‘बी.एस्.एफ्.’ला त्‍यांचे काम योग्‍य प्रकारे करता येत नाही; म्‍हणून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते.

सीमेवरील कारवाया थांबवण्‍यासाठी मधमाशांचे पोळे लावणे, ही कल्‍पना ठीक आहे. मधमाशांनी बांगलादेशी घुसखोर किंवा तस्‍कर यांच्‍यावर आक्रमण केले, तर चांगलेच आहे; पण याची शक्‍यता किती आहे ? हे येणारा काळच सांगेल. कुठल्‍याही नवीन प्रकारचे प्रयोग करण्‍यात काहीच अडचण नाही. बांगलादेश सीमा अधिक सुरक्षित बनली, तर फारच चांगले होईल; पण केवळ मधमाशांच्‍या पोळ्‍यांवर विसंबून चालणार नाही. ‘बी.एस्.एफ्.’ला त्‍यांचे काम अधिक चोख बजावावे लागेल.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.