उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. यशराज सूर्यकांत देशमुख हा या पिढीतील एक आहे !
‘आश्विन कृष्ण एकादशी (९.११.२०२३) या दिवशी सातारा येथील कु. यशराज सूर्यकांत देशमुख (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १५ वर्षे) याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. यशराज सूर्यकांत देशमुख यास १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. यशराज सूर्यकांत देशमुख उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.११.२०२३) ॐ पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. वय ८ ते १० वर्षे
१ अ. एकपाठी आणि हुशार : ‘यशराज एकपाठी असल्याने त्याला भगवद़्गीता आणि मनाचे श्लोक त्वरित पाठ होतात. त्यामुळे तो शाळेतील सर्व पाठांतर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवतो. तो पहिली ते चौथी मध्ये होणार्या स्पर्धा परीक्षेत नेहमी राज्य आणि जिल्हा स्तरावर अव्वल क्रमांक पटकावत असे. गुरुमाऊलींच्या कृपेने त्याला चौथी इयत्तेत असतांना ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून पारितोषिक मिळाले होते.
१ आ. प्रेमळ : तो माझ्यासमवेत सेवेला येतो. तेव्हा तो तेथील सर्वांबरोबर नम्रतेने आणि आदराने वागतो. माझी सेवा अधिक वेळ चालू असल्यास तो शेजारील मुलांशी मैत्री करून त्यांच्या समवेत खेळतो. यशराज इतरांच्यात त्वरित मिसळतो, तसेच सर्वांशी प्रेमाने वागतो. मुलांमध्ये कोणी भांडत असेल, तर त्यांना समजावून सांगतो. तो शाळेत असतांना सर्व मुलांबरोबर प्रेमाने वागतो.
१ इ. धर्माचरणाची आवड : तो शाळेत जातांना प्रतिदिन टिळा लावून जातो. शाळेत काही पालकांनी त्याला ‘तुझा वाढदिवस आहे का ?’, असे विचारल्यास तो त्यांना ‘मी प्रतिदिन टिळा लावतो’, असे सांगतो. त्याला पाहिल्यावर काही पालक ‘त्याच्या चेहर्यावर तेज आहे’, असे सांगतात.
१ ई. उत्स्फूर्तता : यशराज प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला लावलेल्या बालकक्षात सेवा करतो. उत्स्फूर्तपणे घोषणा देतो. त्याला घोषणा त्वरित पाठही होतात.
२. वय ११ ते १३ वर्षे
२ अ. कोरोना महामारीच्या वेळी दळणवळण बंदी (लॉकडाऊन) मध्ये यशराज मला घरकामात साहाय्य करत असे.
२ आ. शिकण्याची आवड
१. त्याला देवपूजा करायला शिकवली. तेव्हापासून तो न चुकता पूजा करतो. सायंकाळी दिवा लावतो.
२. तो रांगोळीसुद्धा सुंदर काढतो. त्याने श्रीरामनवमीच्या दिवशी एका साधिकेने सांगितल्याप्रमाणे श्रीरामतत्त्वाची रांगोळी काढली.
२ इ. परिस्थिती स्वीकारणे आणि समजूतदारपणा : यशराज परिस्थिती स्वीकारतो. कोणत्याही गोष्टीसाठी कधीही हट्ट करत नाही. तो लहान बहिणीला समजून घेतो आणि तिच्याशी प्रेमाने वागतो.
२ ई. साधनेची आवड असणे : यशराज कोरोना महामारीच्या वेळी दळणवळण बंदीमध्ये थोडीफार व्यष्टी साधना करत असे आणि तिचा आढावा देत असे.
२ उ. शिक्षिकेने कौतुक करणे : यशराज पाचवीला उच्च माध्यमिक शाळेत गेल्यावर त्याला शिकवणार्या गर्भवती शिक्षिकेने कुतूहलाने मला विचारले होते, ‘‘यशराज गर्भात असतांना तुम्ही काय खाल्ले होते की, तो इतका हुशार आणि समंजस आहे ?’’ तेव्हा मी त्यांना दत्ताचा नामजप आणि गणपति अथर्वशीर्ष म्हणायला सांगितले.
२ ऊ. यशराजला एखाद्याच्या अपरोक्ष बोललेले आवडत नाही. तसे झाल्यास यशराज मला सांगत असे, ‘‘जाऊ दे ना आई, त्यांची काहीतरी अडचण असेल. आपण कशाला बोलायचे.’’
३. वय १३ ते १५ वर्षे
३ अ. सेवेची आवड : यशराजला संगणकातील पुष्कळ ज्ञान आहे. या सेवेत काही अडचण आल्यास तो मला साहाय्य करतो. पाकीट पोचवणे किंवा अन्य काही सेवा सांगितल्यास ती सेवासुद्धा करतो.
३ आ. त्याला प्रशिक्षणाची आवड आहे. तो प्रत्येक रविवारी प्रशिक्षण वर्गाला जात असे.
३ इ. सेवा करण्यास अडचणी आल्याने खंत वाटणे : या वर्षी गुरुपौर्णिमेला त्याला स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवण्याची आणि संगणकीय सेवा मिळाली होती; परंतु तो ऐनवेळी रुग्णाईत झाल्याने त्याला त्या सेवा करता आल्या नाहीत. याचे त्याला पुष्कळ वाईट वाटले.
३ ई. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : यशराज या वर्षी मे मासात युवा साधकांच्या शिबिराला गेला होता. तेव्हापासून त्याचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाला. तो आढाव्यास नियमितपणे जोडत असे. झालेले प्रयत्न प्रांजळपणे सांगत असे. तसेच स्वतःकडून होणार्या चुका सांगून त्यावर शिक्षा घेत असे. प्रारंभी त्याचे प्रयत्न चांगले झाले; परंतु काही कालावधीनंतर यात घट झाली होती. गेल्या मासात पू. मनीषा पाठक ताईंनी युवा साधकांना आढाव्यात मार्गदर्शन केल्यावर त्याचे प्रयत्न पुन्हा चालू झाले.
४. यशराजचे स्वभावदोष : भ्रमणभाष आणि संगणक यांवर ‘यूट्युब’ पहाण्यात अनावश्यक वेळ घालवणे, भ्रमणभाषवरील खेळ (गेम) खेळण्यात पुष्कळ वेळ घालवतो.
‘हे भगवंता, यशराज मधील स्वभावदोष जाऊन त्याच्या व्यष्टी आणि समष्टी साधनांमध्ये अखंडत्व येऊ देत’, हीच तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’ भगवंता, हे सर्व तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतले, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
– सौ. अस्मिता देशमुख (यशराजची आई), सातारा (१३.१०.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |