दीपावलीचा सण प्रकाशाचा सण आहे. ‘तमसो मा ऽ ज्योतिर्गमय’ असा हा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण आहे; म्हणून त्याला ‘ज्योतीपर्व’ असेही म्हणतात. भारतातील सर्व प्रांतांत हा सण साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्य वेगळे आहे. त्यामुळे या सणातील कार्यक्रमात वेगळेपणा आढळतो. असे असले, तरी सर्वांच्या उत्सवाचा हेतू एकच आहे. हा सण साजरा करण्याच्या पद्धतींत पालट असेल; पण त्यामागची भावना एकच आहे. आचारात पालट असेल; पण विचार एकच आहे. या दीपोत्सवाचा मुख्याधार ‘भारतीय संस्कृती’ हाच आहे. मुळात ही संस्कृती वैदिक संस्कृती आहे. वेदांच्या तत्त्वज्ञानावर ती आधारलेली आहे. या संस्कृतीचा मूलमंत्र ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ हाच आहे.
प्रकाश हे ज्ञानाचे स्वरूप आहे. तम अज्ञानाचे स्वरूप आहे. प्रकाश म्हणजे दीपज्योती ! दीपांचा उत्सव म्हणजे दीपावली ! हा सण म्हणजे प्रकाशपर्व. (भारताचे नामकरणही या प्रकाशपर्वातूनच झालेले आहे. ‘भा’ म्हणजे तेज, ‘भा’ म्हणजे प्रकाश. त्या तेजात, प्रकाशात रत होणारा, रमणारा तो भारत ! तेजाची, प्रकाशाची परंपरा टिकावी; म्हणूनच ‘दीपावली’ साजरी केली जाते. प्रकाशपर्व, आनंदपर्व असणार्या दीपावलीची जनमानसांवर विलक्षण मोहिनी आहे. कृतज्ञतेचा संस्कार करणारा हा लोकप्रिय सण कौटुंबिक स्नेहाचे संवर्धन करतो. नाती-गोती अन् स्नेहसंबंध जोपासणारा हा ‘सणराज’ आहे.
भगवान महावीरांचे महापरिनिर्वाण, विक्रमादित्यांचे सिंहासनारोहण, गुप्तकाळाचा उदय, स्वामी रामतीर्थांचा जन्म आणि निधन, स्वामी दयानंद सरस्वतींचे निधन वगैरे संस्मरणीय घटना दिवाळी सणांशी निगडीत आहेत. दिवाळीच्या सणाला पुरातन परंपरा लाभली आहे. भगवान श्रीकृष्णाचे आत्मज्ञान, भगवान महावीरांचा पुरुषार्थ, भगवान श्रीकृष्णांचे मुक्तीआंदोलन, स्वामी रामतीर्थांची आत्मसाधना, साधू-संतांचे, योगीजनांचे ज्योतीर्दर्शन यांची दिवाळी सण आठवण करून देतो.
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण (साभार : ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)
दिवाळीविषयी सानेगुरुजी म्हणतात…!बाहेर अनंत दिवे पाजळून दिवाळी येत नसते. द्वेष, मत्सर, सूड, स्वार्थ आणि लोभ दूर सारून हृदयात प्रेमाच्या पणत्या लावा. उदार भावनांच्या अमर ज्योती लावा.’ – आनंद साने, पुणे (संदर्भ : अज्ञात) दीपावलीनिमित्त करावयाच्या प्रार्थना !‘हे प्रभो, आमच्या ऋषिमुनींनी ज्या उद्देशाने सण-उत्सवांंचे प्रयोजन केले आहे, त्यातील गर्भितार्थ आम्हाला समजू दे ! त्या दृष्टीकोनातून आमच्या हातून खरी दिवाळी साजरी होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’ ‘हे प्रभो, या दीपावलीनिमित्त आमची शरीररूपी पणती आमच्यातील स्नेहवर्धक प्रेमभावाच्या तेलात ज्ञानरूपी वातीने प्रज्वलित होऊ दे. आमची आत्मज्योत प्रज्वलित झाली, तर इतर पणत्याही प्रज्वलित करून आम्ही ज्ञानप्रकाशाचा उजेड सर्वत्र निर्माण करू शकू. दीपावली आनंदाने साजरी होण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे. या भाग्यानेच आमचे राष्ट्रही ‘भाग्यराष्ट्र’ म्हणून ताठ मानेने उभे राहील. तो दिवसही लवकर येऊ दे.’ |
दीपोत्सव का साजरा करावा ?
‘भारतवर्षात साजरा करणार्या सर्व उत्सवांमध्ये दीपावलीचे सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही दृष्टींनी अत्याधिक महत्त्व आहे. याला ‘दीपोत्सव’ असेही म्हणतात. ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ म्हणजे अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जाणे’ ही उपनिषदांची आज्ञा आहे. आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास रहावा, ज्ञानाचा प्रकाश रहावा, यासाठी प्रत्येकजण मोठ्या आनंदाने दीपोत्सव साजरा करतो.
‘दिवाळी’ शब्द ‘दीपावली’ शब्दापासून बनला आहे. दीपावलीचा अर्थ काय आहे ? ‘दीप + आवली’ या दोन शब्दांची संधी आहे. यामध्ये ‘आवली’चा अर्थ होतो ओळी किंवा रांग. दिव्यांची रांग किंवा दिव्यांची ओळ म्हणजेच दिवाळी. दीपावलीच्या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात.
१४ वर्षांचा वनवास पूर्ण करून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी प्रजेने दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून दीपावली उत्सवाचा आरंभ झाला. आम्ही सहस्रो वर्षांपासून परंपरा म्हणूनच ही दीपावली साजरा करत आहोत. श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार आणि दुष्ट प्रवृत्तीपासून मुक्त केले अन् दैवी विचार देऊन सुखी केले, ही ती ‘दीपावली’ आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
सणांचा राजा : दीपावली !
भारतीय पारंपरिक पंचांगात असा एकही दिवस नाही की, ज्या दिवशी कोणतेही व्रत किंवा पर्वणी नाही. प्रत्येक मासात कोणता ना कोणता तरी सण असतोच. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्यांची बुद्धी सूक्ष्म झाली, त्यांनी तत्कालीन सर्व समाजात या सणांचे महत्त्व बिंबवले. वर्षारंभ, रामनवमी, हनुमानजयंती, अक्षय्यतृतीया, वटसावित्री, गंगादशहरा, जगन्नाथ रथयात्रा, व्यासपौर्णिमा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, जन्माष्टमी, गणेशचतुर्थी किती नावे लिहावीत ? अनेक सण, अनेक व्रतवैकल्ये आणि त्यातही सणांचा राजा म्हणजे दीपावली, दिवाळी, प्रकाशपर्व !
राजाचे आगमन ही सामान्य घटना असते का ? या असामान्याच्या आगमनार्थ कितीतरी आधीपासून सिद्धता करावी लागते. नुकत्याच संपलेल्या वर्षाऋतूने धरणी ‘सुजलाम् सुफलाम् ।’ झालेली असली, तरी अनारोग्याला आमंत्रण देणारे जीवजंतू वातावरणात उत्पन्न झालेले असतात. ओलाव्याने कुठे बुरशी, तर कुठे शेवाळे जमलेले असते, वादळवार्याने घराची छते, भिंती यांची पडझड झालेली असते. याचे प्रदर्शन येणार्या राजाला कसे आवडेल ? त्याला आपली प्रजा, आपला देश स्वच्छ, सुंदर, नीटनेटका, उद्योगी, कार्यरत दिसायला हवा; म्हणून तर झोपडी असो वा महाल, प्रत्येकजण घर स्वच्छ करतो, दुरुस्त करतो, रंग देऊन आकर्षकही करतो अन् मग नवीन खरेदीसाठी घराबाहेर पडतो. घरात येतो तो नवे कपडे, पक्वान्नांसाठी आवश्यक ते सामान, फटाके इत्यादी वस्तू घेऊनच !
– सौ. वसुधा परांजपे, पुणे. (साभार : ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)