पाकिस्तानमध्ये पारपत्रांचाही तुटवडा !

नागरिकांना परदेशात जाण्यास अडचणी !

कराची (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानमध्ये इंधन, वीज, अन्न आदी महाग झाले असतांना आता पाकिस्तानी नागरिकांना पारपत्र मिळणेही कठीण झाले आहे. पारपत्रासाठी लॅमिनेशन कागद महत्त्वाचा असतो. हा कागद फ्रान्समधून मागवला जात होता; परंतु या कागदाचा पाकमध्ये प्रचंड तुडवडा झाल्याने लोकांना पारपत्र मिळेनासे झाले आहे. यामुळे परदेशी शिक्षण किंवा नोकरी यांसाठी जाऊ इच्छिणार्‍यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न केले जात असून ही परिस्थिती लवकरच अटोक्यात आणली जाईल, असे आश्‍वासन गृहमंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी कादीर यार तिवाना यांनी दिली. पाकमध्ये प्रतितिन ३-४ सहस्र पारपत्र बनवली जात होती; मात्र आता दिवसाला केवळ १२-१३ पारपत्रे बनवली जात आहेत.