खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या धमकीनंतर टोरंटो (कॅनडा) विमानतळावर १० जणांची चौकशी !

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

ओटावा (कॅनडा) – ‘सिख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने ‘१९ नोव्हेंबर या दिवशी एअर इंडियाच्या विमानांना जागतिक स्तरावर लक्ष्य केले जाईल आणि त्यांना उड्डाण करू दिले जाणार नाही’, अशी धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यात त्याने १९ नोव्हेंबरला देहलीतील इंदिरा गांधी विमानतळ बंद करण्याची धमकीही दिली होती. ‘१९ नोव्हेंबर हाच दिवस आहे ज्या दिवशी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे’, असे त्याने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवली आहे. या धमकीच्या संदर्भात भारताने कॅनडाशी चर्चा केली आहे. यानंतर १० नोव्हेंबर या दिवशी कॅनडाच्या टोरंटो विमानतळावर अनुमाने १० जणांची कडक चौकशी करण्यात आली आणि त्यांना थेट विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.