१२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘लक्ष्मीपूजन’ आहे. त्या निमित्ताने…
जैन धर्मात दीपोत्सवाची प्रथा साजरी करण्यामागील कारणजैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आपल्या शिष्यांना म्हणाले होते, ‘‘जन्म आणि मृत्यू यांत काहीच भेद (फरक) नाही; म्हणून माझा मृत्यूदिन जन्मदिवसाप्रमाणे आनंदोत्सव करून साजरा करा.’’ भगवान महाविरांचे महानिर्वाण आश्विन अमावास्येलाच झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात आला. जैन धर्मात ती दीपोत्सवाची प्रथा आजही रूढ आहे. – प्रा. रवींद्र धामापूरकर |
संसारातील घोर आपत्ती म्हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्हणून उत्साहाने, न्यायनीतीने आणि सतत कष्ट करून संपत्ती प्राप्त करावी. अशा स्वकष्टार्जित धनलक्ष्मीचे कृतज्ञतेने पूजन करावे अन् ‘माझ्या घरात निरंतर वसती करावी’, अशी तिला प्रार्थना करावी. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी ही सर्व शोभा, आरास आणि पूजेचा थाटमाट. ‘पांडवांचा वनवास संपून ते सुखरूपपणे परत आले म्हणूनही या दिवसाचे महत्त्व वाढले’, असे उल्लेख इतिहास आणि पुराणे यांतून आपल्याला मिळतात. त्यामुळे आपणही दुप्पट उत्साहाने लक्ष्मीपूजन हा दिवस साजरा करतो.
१. श्री लक्ष्मीदेवी कुठे रहाते ?
‘श्री लक्ष्मी कुठे रहाते ?’, असा प्रश्न देवी रुक्मिणीने भगवती लक्ष्मीला विचारला असता, ती म्हणते,
वसामि नित्यं सुभगे प्रगल्भे दक्षे नरे कर्मणि वर्तमाने ।
अक्रोधने देवपरे कृतज्ञे जितेन्द़्रिये नित्यमुदीर्णसत्त्वे ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११, श्लोक ६
अर्थ : (लक्ष्मीदेवी रुक्मिणीदेवींना म्हणाल्या,) हे सुभगे, प्रगल्भ, तसेच कर्तव्याप्रति दक्ष असलेल्या, क्रोधहीन, भक्त, कृतज्ञ, जितेंद्रिय आणि बलवान पुरुषाच्या जवळ मी नित्य वास करते.
स्वधर्मशीलेषु च धर्मवित्सु वृद्धोपसेवानिरते च दान्ते ।
कृतात्मनि क्षान्तिपरे समर्थे क्षान्तासु दान्तासु तथाबलासु ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११, श्लोक १०
अर्थ : स्वधर्माचे पालन करणार्या, धर्म जाणणार्या, वृद्धांच्या सेवेत रत असणार्या, आत्मसंयमी, निर्मळ, क्षमाशील अशा समर्थ पुरुषांच्या ठिकाणी, तसेच क्षमाशील आणि आत्मसंयमी स्त्रियांजवळ मी रहाते.
वसामि नारीषु पतिव्रतासु कल्याणशीलासु विभूषितासु ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११, श्लोक १४
अर्थ : इतरांचे कल्याण करणार्या, अलंकारांनी विभूषित अशा पतिव्रता स्त्रियांजवळ मी वास करते.
पूजनाच्या वेळी गणपतीच्या उजव्या हाताला महालक्ष्मीची प्रतिमा ठेवावी. केशरमिश्रित चंदनाने अष्टदलकमल काढून त्यावर धनलक्ष्मी ठेवावी आणि सर्वांची नेहमीप्रमाणे षोडशोपचार पूजा करावी. दीप लावून त्याचे पूजन करावे आणि प्रार्थना करावी.
त्वं ज्योतिस्त्वं रविश्चन्द्रो विद्युदग्निश्च तारकाः ।
सर्वेषां ज्योतिषां ज्योतिर्दीपावल्यै नमो नमः ॥
अर्थ : तूच ज्योती, तूच सूर्य, चंद्र, विद्युत्, अग्नी आणि तारका आहेस, सर्व ज्योतींची ज्योती असलेल्या हे दीपावली तुला नमस्कार असो.
प्रार्थना झाल्यावर लक्ष्मीची आरती करावी.
– सौ. वसुधा ग. परांजपे, पुणे.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)
२. लक्ष्मीपूजन का करतात ?
आश्विन कृष्ण अमावास्येला लक्ष्मीपूजन करतात. बलीराजाने आपल्या पराक्रमाने सर्व देवांना कैदेत टाकले. भगवान श्रीविष्णूंची पत्नी लक्ष्मी हिला सुद्धा त्याने बंदीवासात टाकले. त्यामुळे श्रीविष्णूंनी वामनावतार घेऊन बलीकडून ३ पावले भूमी मागून, त्याला पाताळात ढकलले. सर्व देव आणि लक्ष्मी यांची सुटका केली. तो दिवस आश्विन कृष्ण अमावास्येचा होता. लक्ष्मी आणि सर्व देवता यांची मुक्तता झाल्यामुळे सर्वांना अत्यानंद झाला. तेव्हा सर्वांनी भगवान श्रीविष्णूंकडे एक मागणे मागितले, ‘लक्ष्मीचे वास्तव्य प्रत्येकाच्या घरी असावे.’ त्याची चिरंतन आठवण म्हणून सर्व लोक या दिवशी लक्ष्मीदेवीची घरोघरी पूजा करतात. व्यापारी मंडळी आपल्या हिशोबाचा आढावा घेऊन लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मीपूजन हे प्रदोषकाळी, म्हणजे संध्याकाळच्या वेळी करायचे असते.
३. लक्ष्मीपूजनाचे स्वरूप
आश्विन अमावास्येला पांढर्या शुभ्र छोट्या गादीवर लोडाला टेकवून श्रीलक्ष्मीला सुप्रतिष्ठित करावे. साळीच्या लाह्या आणि बत्तासे वाहून तिची पूजा करावी. बर्फी, बासुंदी असा पांढरा गोड नैवेद्य दाखवावा. ‘माझ्या घरी स्थिर हो’, अशी तिथी प्रार्थना करावी. सुवासिनींना हळदी-कुंकवाला बोलवावे. लाह्या, बत्तासे यांनी त्यांच्या ओट्या भराव्यात. लक्ष्मीपूजनाचे स्वरूप असे असते.
४. दीपोत्सव साजरा करण्यामागील कारण
आश्विन अमावास्येला सर्वत्र दिव्यांची आरास करावी. या दिवशी लक्ष्मी आणि तिची थोरली बहीण अलक्ष्मी स्वर्गातून गरुडावर बसून पृथ्वीवर फेरफटका मारतात. जिथे प्रकाश दिसतो तिथे अलक्ष्मी, म्हणजे ‘दरिद्रादेवी’ प्रवेश करत नाही. जिथे अंधार दिसतो, तिथे ही ‘दरिद्रादेवी’ प्रवेश करून कायमची वस्तीला रहाते. जिथे प्रकाश दिसतो, तिथे लक्ष्मी प्रवेश करून कायमचे वास्तव्य करते; म्हणूनच या दिवशी घरात, घरासमोर दिवे, पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करायचा असतो. श्रीलक्ष्मीला आपल्या घरी स्थिर करावयाचे असते.
आपला १४ वर्षांचा वनवास संपवून श्रीराम प्रभु अयोध्येला आले, तो दिवस आश्विन अमावस्येचाच होता. रावणाचा वध करून आलेल्या श्रीरामाचे स्वागत आणि युद्ध विजयोत्सव अयोध्येच्या जनतेने दीपोत्सवाने साजरा केला. दिवाळीचे ज्योतीपर्व त्या घटनेची आठवण करून देते.
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.