सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या सोहळ्यानिमित्त ‘खासदार उदयनराजे भोसले मित्र समुहा’च्या वतीने भव्य ‘ऐतिहासिक किल्ले स्पर्धां’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा समूह गट, वैयक्तिक मोठा गट आणि वैयक्तिक छोटा गट अशा ३ विभागांत आयोजित केली आहे. आजच्या पिढीला गडांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे आणि तो वारसा त्यांनी जपावा, या हेतूने या आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून स्पर्धकांनी ११ नोव्हेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. ही स्पर्धा सातारा शहरापुरती मर्यादित आहे. किल्ले परीक्षण १३ आणि १४ नोव्हेंबरला असून परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
समूह गटासाठी १० सहस्र ते २ सहस्र अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. वैयक्तिक मोठ्या आणि छोट्या गटात प्रथम पारितोषिक सायकल, द्वितीय पारितोषिक कॅरम बोर्ड, तृतीय पारितोषिक क्रिकेट बॅट आणि कीट देण्यात येणार आहे, तसेच उत्तेजनार्थ म्हणून आकर्षक ‘मावळा गेम’ दिली जाणार आहे. किल्ल्याची बांधणी परीक्षणापूर्वी पूर्ण असावी. किल्ल्याची थोडक्यात माहिती परीक्षकांसमोर स्पर्धकांनी द्यावी. नाव नोंदणी करतांना पत्ता, माहिती आणि तिचे ठिकाण अचूक सांगावे.