‘दिवाळी पहाट !’

दिवाळी आणि ‘पहाटेचे अभ्‍यंग स्नान’, हे अतिशय सुंदर समीकरण आहे. सध्‍या ‘उठा उठा दिवाळी आली’, हे विज्ञापन दिसायला लागले की, दिवाळीची लगबग चालू होते. पूर्वीच्‍या काळी सर्वच जण पहाटे उठून अभ्‍यंग स्नान करत असत. दिवाळीत पहाटेच्‍या थंडीत अभ्‍यंग स्नान, दिव्‍यांची आरास, देवदर्शन, थोरामोठ्यांचे आशीर्वाद अन् मग फराळ या कृती करणे, हे अतिशय आनंददायी आणि सणाचा आध्‍यात्मिक आनंद देणारे असते ! त्‍यामुळे सणाचे पावित्र्य टिकून रहाते; किंबहुना हेच त्‍या सणाचे वैशिष्‍ट्य असते !

श्री. केतन पाटील

मधल्‍या काळात फटाक्‍यांचे प्रमाण वाढले आणि ‘फटाके फोडणे’, म्‍हणजेच दिवाळी असा चुकीचा समज पुढच्‍या पिढीमध्‍ये वाढत गेला. याच काळात विशेषतः पुणे, मुंबई, ठाणे यांसारख्‍या शहरांमधून आणि आता बहुतेक ठिकाणी ‘दिवाळी पहाट’ या नावाने संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही शास्‍त्रीय संगीताचे कार्यक्रम अर्थात्‌च दर्जेदार असतात, यात शंका नाही; परंतु काही ठिकाणी अन्‍य कार्यक्रमांचे आयोजनही केलेले असते. असे मनोरंजनाचे कार्यक्रम दिवाळीच्‍या पहाटेच ठेवले गेल्‍याने दिवाळीची देवदर्शनाची आणि एकमेकांना भेटण्‍याची पहाट मात्र हरवायला लागली. आध्‍यात्मिक स्‍तरावर अनुभवण्‍याच्‍या ‘दिवाळीच्‍या पहाटे’चा आनंद मनोरंजनाच्‍या विविध कार्यक्रमांनी व्‍यापला गेला आहे. रावणाचा वध करून प्रभु श्रीराम अयोध्‍येला परत आले, त्‍या वेळी प्रजेने ‘दीपोत्‍सव’ केला. तेव्‍हापासून चालू असलेला दीपोत्‍सव आजही त्‍याच भावाने अनुभवला, तर खरोखरच आनंद मिळतो ! दीपावलीमधील सर्वच सणांच्‍या दिवसांवर ही मनोरंजनाची झाकोळी आली आहे. धर्मशास्‍त्रात सांगितल्‍याप्रमाणे दिवाळीमध्‍ये प्रत्‍येक सणाचे आध्‍यात्‍मिक महत्त्व आहे. ‘या दिवशी कोणती धार्मिक कृती करावी ?’, हे सुद्धा सध्‍याच्‍या पिढीला ठाऊक नाही’, अशी स्‍थिती आहे. ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमांमुळे काही जण पहाटे उठून कार्यक्रम संपेपर्यंत दूरचित्रवाहिनीसमोर बसतात, तर काही जण प्रत्‍यक्ष कार्यक्रमाला जातात आणि बघता बघता अर्धा दिवस संपून जातो.

खरेतर असे संगीताचे कार्यक्रम दिवसभर कधीही अथवा वर्षभरातही आयोजित केले जाऊ शकतात. हिंदु धर्मातील प्रत्‍येक सण-उत्‍सव देव, देश अन् धर्म यांप्रती अभिमान निर्माण करणारे आहेत. सद्यःस्‍थितीला राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे कार्यक्रम अन् उपक्रम यांची अतिशय आवश्‍यकता आहे. या वेळी ‘किल्ले बनवण्‍या’च्‍या उपक्रमाला प्राधान्‍य द्यायला हवे. या समवेतच सणांची शास्‍त्रीय माहिती देणारे, त्‍यांचे महत्त्व सांगणारे आणि धर्माभिमान निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित व्‍हायला हवेत. दिवाळीमध्‍ये अभ्‍यंग स्नानामुळे होणारे लाभ, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा, यमदीपदान असे विविध सण साजरे करण्‍याची पद्धत आणि महत्त्व जाणून त्‍या भावाने ते साजरे करायला हवेत, तर त्‍याचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. धर्मशास्‍त्राचा हा ज्ञानदीप घरोघरी लावल्‍यास दिवाळीची केवळ एक पहाटच नव्‍हे, तर संपूर्ण दिवाळी आनंददायी होईल !

– श्री. केतन पाटील, पुणे