७ नोव्हेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्या निमित्ताने…
एका अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे ज्याला प्रसारमाध्यमे यथायोग्य महत्त्व देणार नाहीत, त्याकडे मला लक्ष वेधायचे आहे. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ने ‘कॅन्सर’वरील (कर्करोगावरील) आयुर्वेदाच्या उपचारांसाठी येत्या ३ वर्षांत स्वतंत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्र खोपोली येथे उभारण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. ‘हेड नेक कॅन्सर विभागा’चे प्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी याप्रसंगी म्हणाले, ‘‘कॅन्सरवरचे अॅलोपॅथी उपचार पुष्कळ महाग आहेत. खिशाबाहेरचा व्यय आहे, तसेच त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. उपचाराच्या कालावधीत काही रुग्णांची स्थिती अशी होते की, ते तोंडाने अन्नही खाऊ शकत नाहीत. उपचाराच्या कालावधीत ते अशक्त होतात. त्यांच्यावर उपचार होणे आता सोपे होईल.’’ (संदर्भ : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’, ६.११.२०२३) याच प्रसंगी ते असेही म्हणाले, ‘‘आयुर्वेदात प्रतिकारशक्ती उत्तम वाढवली जात असल्याने ‘केमो’ थेरपी आणि ‘रेडिएशन’ (‘केमो’ आणि ‘रेडिएशन’ हे दोन्ही कर्करोगावरील उपचार आहेत.) यांचे दुष्परिणाम घालवण्यासाठी आयुर्वेद उत्तम काम करतो.’’ (संदर्भ : ‘फ्री प्रेस जर्नल’, ६.११.२०२३)
सर्वप्रथम हे पाऊल उचलल्याने टाटा मेमोरियलला धन्यवाद !
कर्करोगावर आयुर्वेद उपचार घेण्याविषयी काही महत्त्वाची सूत्रे
१. ‘आयुर्वेदाने कर्करोग पूर्णपणे बरा होतो’, वगैरे मोठे दावे आमच्यासारखे वैद्य करत नाहीत; मात्र ‘कर्करोगामध्ये आयुर्वेदाचे उपचार उपयुक्त असतात’, हे आम्ही आमच्या कर्करोगाच्या रुग्णांकडे पाहून सांगू शकतो.
२. आयुर्वेदाचे कर्करोगावरील उपचार हे केवळ वनस्पतींसह होणार नाहीत. त्याला रसशास्त्राची जोड द्यावीच लागेल. याविषयी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील तज्ञ काय भूमिका घेतात ? हे पहाणे रोचक ठरेल. अशा परिस्थितीत आयुर्वेदाची पूर्ण क्षमता वापरणे त्यांनाच अडचणीचे होणार असल्याने एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे ‘प्रतिकारशक्ती वाढवणे’, या पलिकडचे उपचार म्हणून महत्त्वाची भूमिका कितपत समोर येईल, याची शंकाच आहे.
३. विद्यमान स्थितीत कर्करोगाचे अॅलोपॅथी उपचार चालू असतांना तेथील तज्ञांकडून ‘आयुर्वेद घेऊ नका. त्याने दुष्परिणाम होतील’, असे सर्रास सांगितले जाते. टाटा मेमोरियलमधील तज्ञही याला अपवाद नाहीत. त्यांनी किमान आता तरी अशी दिशाभूल करणे थांबवावे, ही नम्र विनंती.
४. टाटासारखी नामांकित संस्था कर्करोगावर आयुर्वेद उपचारांविषयी पुढाकार घेत आहे, म्हणजे ‘कर्करोगाच्या रुग्णांना आयुर्वेदाच्या उपचारांचा लाभ होतो’, हे किमान सत्य मान्य केले गेले आहे, हे सामान्य वाचकांनी लक्षात घ्यावे; मात्र त्याच वेळी हे उपचार शासन नोंदणीकृत आणि शक्यतो या क्षेत्रात उपचारांचा उत्तम अनुभव असलेल्या वैद्यांकडून घ्यावे. आपणासह अन्यांनाही पर्यायांविषयी सजग करूया ! (७.११.२०२३)
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.