|
नवी मुंबई – गौणखनिजांवरील ‘रॉयल्टी’ (स्वामीत्वधन) भरण्याचे खोटे पावती पुस्तक छापून महसूल विभागाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचे काम डंपर व्यावसायिकांकडून केले जात आहे. दिवसाला दीड ते दोन सहस्र डंपर अशा पावत्यांचा वापर करून मुंबईत प्रवेश करतात. हे उघडकीस आल्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरकारचा महसूल विभाग या गौणखनिजांवर रॉयल्टी आकारतो; पण ती भरण्यासाठी असा खोटा प्रकार करण्यात येतो. या प्रकरणी ‘दगडखाण क्रशर असोसिएशन’ने महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पनवेल तहसील कार्यालय, महसूल विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस यांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. गौणखनिज प्रकरणी सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असल्याने या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे भाजपचे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले आहे.