सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे ! – पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज, बागेश्‍वर धाम 

निवडणूक लढल्‍याने नाही, तर लोकांच्‍या विचार परिवर्तनाने हिंदु राष्‍ट्र बनेल !

पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज

छत्रपती संभाजीनगर – धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालते. राजकारणाने धर्मकारण चालत नाही; पण धर्मकारणाने राजकारण नक्‍कीच चालते. सनातन हिंदुत्‍व स्‍थापन करणे हे माझे उद्दिष्‍ट आहे. त्‍यासाठी कथांच्‍या माध्‍यमातून मी प्रचार आणि प्रसार करत आहे. कोणत्‍याही पक्षाचा किंवा राजकीय व्‍यक्‍तीचा प्रचार-प्रसार बागेश्‍वर धामच्‍या गादीवरून केला जात नाही. यापुढेही केला जाणार नाही. निवडणूक लढल्‍याने हिंदु राष्‍ट्राची निर्मिती होणार नाही. लोकांच्‍या विचार परिवर्तनाने हिंदु राष्‍ट्र बनेल. सनातन धर्माच्‍या प्रचार-प्रसाराने हिंदु राष्‍ट्राची निर्मिती होईल, असे मार्गदर्शन बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांनी ६ नोव्‍हेंबर या दिवशी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केले.

१. पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज पुढे म्‍हणाले, ‘‘मी निवडणूकही लढणार नाही. मी धर्मप्रचारावर विश्‍वास ठेवतो. मी केवळ हिंदूंना जागवण्‍याचा प्रयत्न करीन.  मी सर्व राजकारण्‍यांना निवेदन करतो की, कोणत्‍याही ‘बाबां’मुळे तुम्‍ही निवडणूक जिंकू शकणार नाही. त्‍याउलट जनतेला ‘बाबा’ मानून काम करा. तरच निवडणूक जिंकणे शक्‍य आहे.

२. अंधश्रद्धा निर्मूलन समिती माझ्‍यावर अंधश्रद्धा पसरवत असल्‍याचा आरोप करते; पण ते केवळ माध्‍यमांतून आरोप करतात. त्‍यांनी प्रत्‍यक्ष येऊन माझ्‍याशी चर्चा करावी.

३. वर्ष २०१० नंतर सनातन हिंदु म्‍हणण्‍यासाठी लोकांना भीती वाटत होती. आता लोक निर्भीडपणे हिंदुत्‍वाविषयी बोलतात. जोपर्यंत देशात हिंदु राष्‍ट्र होणार नाही, तोपर्यंत हिंदु या देशात सुरक्षित नाहीत.