इस्रायल आणि हमास यांच्‍यातील नूतन संघर्ष : दु:खद कोंडी कि पेच ?

‘सध्‍या हमास आणि इस्रायल यांच्‍यात चालू असलेल्‍या युद्धाचा शेवट काय होईल ? याविषयी इस्रायललाही जाणीव नाही. प्रदेशाच्‍या लाभासाठी राजकीय नेत्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍याशी संबंधित आतंकवादी किंवा खूनी घटक यांना आळा घालण्‍यासाठी सात्त्विक बुद्धी प्रबळ होईल, अशी मी आशा करतो. या गुंतागुंतीच्‍या समस्‍येवर कोणताही एक पक्ष उपाय शोधू शकत नाही. या लेखात आपल्‍याला काहीतरी नवीन वाचता येईल, अशी मला आशा आहे. ३ नोव्‍हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘हमासचे इस्रायलवरील आक्रमण आश्‍चर्यकारक, आणि ‘अब्राहम करार’ एवढा महत्त्वपूर्ण का होता  ?’, याविषयीचे लिखाण वाचले.

इस्रायल-हमास युद्धातील विध्‍वंसाचे छायाचित्र

१. अमेरिकेच्‍या समस्‍या आणि इराणच्‍या इस्‍लामिक जगावर अधिकार गाजवण्‍याच्‍या स्‍वप्‍नांना थेट आव्‍हान !

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्‍या प्रशासनाला अफगाणिस्‍तान, चीन आणि रशिया यांच्‍या परराष्‍ट्र धोरणातील अपयशाचा सामना करावा लागला. ‘मिडल ईस्‍ट’ (मध्‍य पूर्व) देशांमध्‍ये शांतता असल्‍यामुळे युक्रेन आणि ‘इंडो पॅसिफिक’ यांच्‍या समस्‍यांवर लक्ष देण्‍यासाठी अमेरिका उत्‍सुक होती. परराष्‍ट्र धोरण म्‍हणून बायडेन प्रशासन अरब जगाशी स्‍वतःचा संघर्ष न्‍यून करण्‍यासाठी उत्‍सुक होते, जेणेकरून अमेरिका मध्‍य पूर्वेतून बाहेर पडू शकेल आणि दक्षिण चीन समुद्रातील रशियाच्‍या युद्धामुळे उद़्‍भवलेल्‍या युक्रेन अन् चीन यांच्‍यामधील चिंताजनक नवीन क्षेत्रांवर केंद्रित करू शकेल. अमेरिकेला अब्राहम कराराचे साहाय्‍य मिळाले आणि पुढच्‍या परराष्‍ट्र धोरणाला गती देण्‍याची वेळ आली. इराणविषयीचा परस्‍पर द्वेष, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू आणि महंमद बिन सलमान यांच्‍यासाठी अब्राहम करार सामान्‍य आधार बनला. अमेरिकेने मध्‍यस्‍थी केलेल्‍या गंभीर चर्चेने दोन्‍ही बाजूंना स्‍वाक्षरी करण्‍यापर्यंत आणले. जरी हा करार सर्व पक्षांसाठी विजय होता; परंतु इस्रायलने पॅलेस्‍टाईनच्‍या संदर्भात काही गंभीर सवलतींना मान्‍यता दिल्‍याखेरीज सौदीने होकार देणे सोपे नव्‍हते.

महंमद बिन सलमान सौदीचे हुकूमशाह असले, तरी ते त्‍यांच्‍या जनमतासंदर्भात संवेदनशील होते. पॅलेस्‍टिनींनी सौदीखेरीज एखादा करार केला असता, तर तो विनाशकारी ठरला असता. असे मानले जाते की, कट्टर पुराणमतवादी उजव्‍या विचारसरणीचे पंतप्रधान नेतान्‍याहू असे काही करू इच्‍छित होते की, जे सौदी आणि इस्रायल यांच्‍यातील शांतता करारासाठी पुरेसे ठरले असते. सौदी अरेबियाला अमेरिकेने दिलेला सैनिकी पाठिंबा आणि सौदी अरेबियामध्‍ये नागरी अणू सुविधा निर्माण करण्‍यासाठीची अनुमती आणि सक्रीय साहाय्‍य, हा या कराराचा अनुमानित भाग होता. अमेरिकेमध्‍ये आंतरिक विरोध असूनही बायडेन प्रशासन हा करार सौदीकडून इस्रायलींना खूश करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या हमीसह होऊ द्यायला सिद्ध होते.

असा विश्‍वास होता की, हा करार त्‍याच्‍या मसुद्याच्‍या अंतिम टप्‍प्‍यात असून लवकरच दोन्‍ही राष्‍ट्रप्रमुखांच्‍या स्‍वाक्षरीसाठी सिद्ध आहे; परंतु असा करार होणे, म्‍हणजे एका राष्‍ट्राला (इराणला) स्‍वतःचे स्‍वामित्‍व गमवावे लागणे, असे वाटत होते. अणू सक्षम सौदी अरेबिया हे इराणच्‍या इस्‍लामिक जगावर अधिकार गाजवण्‍याच्‍या त्‍याच्‍या स्‍वप्‍नांना थेट आव्‍हान होते आणि त्‍याचा कट्टर प्रतिस्‍पर्धी इस्रायलचा मुत्‍सद्दी विजय ! कित्‍येक वर्षांपासून इराण गाझा पट्टीमधील हमास (सुन्‍नी संघ) आणि लॅबेनॉनमधील हिजबुल्‍ला यांना आर्थिक साहाय्‍य करत आहे. शिया आणि सुन्‍नी हे एकमेकांचे वैरी असले, तरी त्‍या दोघांसाठी परस्‍पर वैरापेक्षा इस्रायलशी वैर अधिक मोठे होते. इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्‍यातील करार मोडून काढणे इराणला आवडले असते, असा विचार करणे तर्कसंगत ठरेल. दुसर्‍या बाजूला हमासच्‍या मनात इस्रायलच्‍या ‘झिओनिस्‍ट’ (ज्‍यू) राज्‍याविषयी द्वेष आहे. त्‍याने सर्व ज्‍यूंना मारून इस्रायल राज्‍यच नष्‍ट करायचा निर्धार केला आहे.

२. हमासची आक्रमणसिद्धता कशी झाली ?

जनरल नितीन गडकरी (निवृत्त)

मध्‍य पूर्व देशांत पूर्वी घडलेल्‍या, जेरुसलेममध्‍ये पवित्र रमजान मासातील ‘अल्-अक्‍सा’ मशिदीवर इस्रायली पोलिसांचे आक्रमण, गेल्‍या वर्षी झालेली पॅलेस्‍टिनींची हत्‍या, यांसारख्‍या प्रसंगांमुळे कधीही युद्धाचा भडका उडण्‍यासारखे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्‍थितीत ‘आपल्‍यावर हमासचे आक्रमण होऊ शकते’, याविषयी इस्रायल शांत का होता ? हे गोंधळात टाकणारे होते. कदाचित् इस्रायली गुप्‍तचर आणि सैन्‍य ‘हमास इस्रायलच्‍या भूमीवर आक्रमण करणे अशक्‍यप्राय आहे’, या अहंभावात होते. इस्रायलच्‍या दक्षिणेकडील सीमेजवळ ७ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी सुसज्‍जपणे केलेल्‍या आक्रमणाची योजना आखण्‍यासाठी हमासला काही मास नाही, तर वर्षे लागली असती. इस्रायलला निश्‍चिती होती की, हमासमध्‍ये इतकी क्षमता नाही आणि हे खरेही असू शकते. त्‍यामुळे हमासला आर्थिक, आधुनिक शस्‍त्रे आणि नियोजन करून इस्रायलवर आक्रमण करण्‍यासाठी बाहेरून साहाय्‍य मिळाले असले पाहिजे. घुसखोरीच्‍या ठिकाणी पाळत ठेवणे, अचूक लक्ष्य साधून आक्रमणाची योजना आखणे, यांसाठी सैनिकी मनाची आवश्‍यकता होती. हमासने केलेल्‍या अशा प्रकारच्‍या आक्रमणाने इस्रायल तथा पाश्‍चात्त्य जग आश्‍चर्यचकित झाल्‍यास नवल ते काय ? हमासला एवढे साहाय्‍य कुठून मिळाले असेल ? याचा कयास बांधायला रॉकेट सायन्‍सची आवश्‍यकता नाही.

३. इस्रायली सैन्‍यासमोर असलेले आव्‍हान !

इस्रायलने भूमीवर आक्रमण चालू केले आहे. त्‍याची त्‍याविषयीची उद्दिष्‍टे काय आहेत ? आणि इस्रायली संरक्षण दलाच्‍या इच्‍छेनुसार शेवटची स्‍थिती काय असेल ? हा अनुमानाचा विषय आहे. तरीही अनुभवाच्‍या दिशेने गेल्‍यास इस्रायली संरक्षण दलाला लाभ होणे शक्‍य वाटत नाही. हमास आणि पॅलेस्‍टिनी कार्यकर्ते ओळखता येत नाहीत; कारण सर्व पॅलेस्‍टिनी एकसारखे दिसतात. याखेरीज हमास सदैव ‘सैनिकी संघटना’ म्‍हणून कार्य करत नाही. ते सर्व स्‍वतंत्रपणे आतंकवादी गटात कार्य करत असतात. दुसरे कारण, म्‍हणजे गाझा हा अत्‍यंत दाट वस्‍ती असलेला प्रदेश आहे. त्‍यामुळे ‘बूबी ट्रॅपर्स’ (निरुपद्रवी वस्‍तूमध्‍वे लपवून ठेवलेले स्‍फोटक यंत्र) आणि खाणींनी भरलेले ढिगारे यांतून मार्ग काढणे, अशा परिस्‍थितीतून जलद गतीने कृती करणे कसे शक्‍य आहे ? समजा नागरिक आणि सैन्‍यातील अधिकारी अन् कर्मचारी यांची सुटका करणे, हा उद्देश आहे, तर जोपर्यंत हमास इस्रायली संरक्षण दलाला कराराचा एक भाग म्‍हणून त्‍यांना सोडत नाही किंवा सवलत देत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्‍याला हे साध्‍य करणे शक्‍य नाही. हमासने भूमीतच निरनिराळ्‍या स्‍तरांवर (खोल) बोगद्यांमध्‍ये एक अत्‍याधुनिक प्रणाली विकसित केली आहे, ज्‍यामुळे त्‍यात प्रवेश करणे किंवा त्‍यांना नष्‍ट करणे सोपे नाही. यांपैकी काही बोगद्यांमध्‍ये या लोकांना ओलीस ठेवले असल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर आहे.

४. इस्रायल काय करू शकतो ?

तर्क काढणे, हेसुद्धा आव्‍हानासमान दिसते. इस्रायल गाझाच्‍या भूमीवर हवेतून कितीही आक्रमणे करून त्‍यांची ठिकाणे नष्‍ट करू शकतो; परंतु भूमीच्‍या अंतर्गत तो तसे करू शकत नाही; कारण हमासचे आतंकवादी भूमीच्‍या अंतर्गत रहातात. म्‍हणून ७ ऑक्‍टोबर या दिवशी झालेल्‍या आक्रमणानंतर पॅलेस्‍टाईनचे नागरिक नाहक मारले गेले. त्‍यांनाही या युद्धाचा खरा त्रास होतो आहे. ‘हमास’ अतिशय क्रूर आणि दुराचारी आहे. त्‍याचे आतंकवादी सुरक्षितपणे भूमीखाली दडून बसले आहेत. इस्रायलने हवेतून केलेल्‍या आक्रमणांची झळ त्‍यांच्‍यापर्यंत पोचूच शकत नाही. हमासचे वरिष्‍ठ कमांडर कतारमध्‍ये एका पंचतारांकित हॉटेलमध्‍ये राहून तेथूनच युद्धासंदर्भातील सर्व सूत्रे हलवत असावेत, असा कयास आहे.

इस्रायल पॅलेस्‍टाईनवर जसजसे आक्रमण वाढवेल, पॅलेस्‍टाईनच्‍या मृतांच्‍या संख्‍या वाढत जाईल, तसतशी इस्रायलवरील टीकाही तीव्र होत जाईल. इस्रायलवर वेढा उठवण्‍यासाठी, जीवनावश्‍यक मूलभूत वस्‍तू गाझात पोचवण्‍यासाठी, तसेच पॅलेस्‍टीनच्‍या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित करण्‍यासाठी दबाव येईल; परंतु २ कोटी लोकांना निर्वासित छावणीत हलवणे शक्‍य होईल का ? अशक्‍य ! अशा तर्‍हेने इस्रायलला सर्वांत कठीण परिस्‍थितीचा सामना करावा लागेल. त्‍याने हमासला नेस्‍तनाबूत करायचा संकल्‍प केला आहे; परंतु ते करण्‍यासाठी त्‍याला योग्‍य परिस्‍थिती दिसत नाही. नेतान्‍याहू आणि त्‍यांचे युद्धाचे मंत्रीमंडळ यांनी स्‍वत:ला या बंधनात अडकवले आहे; कारण हिंसा हा हिंसेवरील न्‍याय्‍य उपाय मानता येणे शक्‍य नाही. हमासला नष्‍ट करण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न साध्‍य होण्‍यासाठी एक तर ‘एक राज्‍य’, हा नेतान्‍याहू आणि त्‍यांच्‍या युद्ध मंत्रीमंडळाचा ध्‍यास त्‍यांना सोडावा लागेल अथवा अरब राष्‍ट्रांशी मैत्री आणि शांततापूर्ण संबंध, या त्‍यांच्‍या स्‍वप्‍नाला तिलांजली द्यावी लागेल. हे युद्ध पहाता सौदी अरेबिया तूर्तास तरी ‘अब्राहम करारा’वर स्‍वाक्षरी करणार नाही. जे स्‍वत:ला जनतेचे नेते असल्‍याचा दावा करतात, तेच आपापसांतील शांतता बिघडवण्‍यासाठी उत्तरदायी ठरत आहेत. हाच खरा मध्‍य पूर्वेचा पेच आहे !’

– जनरल नितीन गडकरी (निवृत्त)

(ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्‍या ब्‍लॉगवरून साभार)