१. स्वातंत्र्यापासून भारताने अलिप्ततावाद स्वीकारल्याने झालेली हानी !
भूतकाळातून जे काही शिकत नाहीत, त्यांना इतिहास क्षमा करत नाही. स्वातंत्र्यापासून भारताने अलिप्ततावादाची न बसणारी टोपी घातलेली असल्याने राष्ट्राची पुष्कळ हानी झाली आहे. खरे म्हणजे परराष्ट्रीय घडामोडींमध्ये अलिप्ततावादाला स्थान नाही. तरीही एका बाजूने गरीब देश जे कोणत्याही देशाला युद्धामध्ये किंवा राजकीय अस्थिरतेच्या वेळी साहाय्य करू शकत नाही किंवा अगदी श्रीमंत देश जे राजाप्रमाणे वा अद़्भुत नगरीत रहात आहेत, असे देश नेहमीच अव्यवहार्य अशी अलिप्ततावादाची टोपी वापरत आहेत. खरेतर अशा वृत्तीचा चांगल्यासाठी काहीही उपयोग होत नाही. चीनशी युद्धाच्या पूर्वी आपल्या तत्कालीन शासनकर्त्यांनी अलिप्त रहाण्याची घोडचूक केली. केवळ बोलणी करून आणि विविध देशांमधील युद्धांच्या वेळी गोड बोलण्याखेरीज आपण विशेष असे काहीही केलेले नाही.
याचा परिणाम म्हणजे वर्ष १९६२ मध्ये जेव्हा आपले (भारताचे) चीनशी युद्ध झाले, तेव्हा ‘आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळावा’, या आवाहनाकडे इतर राष्ट्रांनी काहीही सौजन्य न दाखवता दुर्लक्ष केले. पाकिस्तानशी झालेल्या तीनही युद्धांच्या वेळीही तत्कालीन प्रमुख राष्ट्रांकडून असाच प्रतिसाद मिळाला. वर्ष १९७१ मध्ये पाकशी झालेल्या युद्धाच्या वेळी रशियाखेरीज कोणतेही राष्ट्र भारताच्या बाजूने उभे राहिले नाही. वर्ष १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धाच्या वेळी भारताला इस्रायलने पुष्कळ प्रमाणात साहाय्य केले. ‘युद्ध करणे’, हे कुणालाही निश्चितपणे आवडत नाही. सर्वसाधारण मनुष्य तरीही सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या अगदी विरोधात आहे. काही वेळा युद्ध हे लादले जाते, तर काही वेळा आपणहून युद्धाला आमंत्रण दिले जाते. युद्ध झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात; परंतु तोपर्यंत युद्धात सहभागी झालेली आणि सहभागी न झालेली राष्ट्रे यांचीही हानी होते.
२. इस्रायलने हमासच्या विरोधात प्रतिकार करणे योग्य !
इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धाची सध्याची स्थिती पहाता इस्रायलवर हे युद्ध लादले गेले आहे, यात कोणतीही शंका नाही. इस्रायलने कोणतीही कुरापत काढलेली नसतांना वा कोणतीही पूर्वसूचना न देता गाझा पट्टीतील हमासच्या आतंकवाद्यांनी हवाई मार्ग, भूमीवरून आणि जलमार्गाने त्याच्यावर आक्रमण केले अन् मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यामध्ये त्यांनी महिला आणि लहान मुले यांच्यासह अनेक निष्पाप लोकांना ठार केले, तसेच त्यांच्या मालमत्तेची हानी केली. यामुळे इस्रायलला हमासच्या विरोधात प्रतिकार करणे आवश्यक झाले.
३. हमासच्या आक्रमणाला दिलेला धार्मिक रंग !
या घटनांवरून समजूतदार माणूस यामध्ये धर्म आणणार नाही. इस्रायलमध्ये ‘ज्यू’ हा प्रमुख धर्म, तर पॅलेस्टाईनमध्ये पुष्कळ प्रमाणात इस्लाम धर्मीय आहेत. हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाविषयी कोणत्याही धर्माच्या राष्ट्रांनी एकमुखाने निषेध केला पाहिजे. याऐवजी बहुतांश सर्व इस्लामी राष्ट्रांनी हमासने केलेल्या आक्रमणाला धार्मिक किंवा जातीय रंग दिला अन् यातून त्यांच्या मनाची संकुचितता दिसून येते. याही पुढे जाऊन हा पाठिंबा हमास या आतंकवादी संघटनेला दिलेला असून यामध्ये पॅलेस्टाईन सरकार कुठेही दिसत नाही.
४. भारताची पॅलेस्टाईनविषयीची भूमिका कितपत योग्य ?
याविषयी आपण भारताने काय केले ? हे हास्यास्पद आहे. आपण हमासने केलेल्या हिंसाचाराचा लगेच निषेध केला, हे पुष्कळ चांगले केले, यात शंका नाही; परंतु इस्रायलने प्रतिकार म्हणून केलेल्या कृतीला विनाअट पाठिंबा देण्यासाठी आपली पावले मागे घेतली. स्वतःविषयी अभिमान असलेले कोणतेही राष्ट्र कोणत्याही बाहेरील शक्तीने आक्रमण केले, हे सहन करणार नाही. ‘सार्वभौम देश’ म्हणून इस्रायलने नेमके हेच केले आहे. आपण मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर राष्ट्रे यांच्याप्रमाणे इस्रायलच्या बाजूने उभे न रहाता दिशा पालटली अन् मानवतेवर व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. ऑस्ट्रीच पक्षाप्रमाणे केलेल्या या कृतीवर समाधानी न रहाता आपण मानवतेच्या दृष्टीने पॅलेस्टाईनमध्ये काहीही किंमत नसलेल्या सरकारला साहाय्य केले. त्यामुळे आपण केलेले वैद्यकीय साहाय्य आणि तंबू इत्यादी हमासच्या आतंकवाद्यांच्या हातात पडले आहे.
५. भारताने इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे महत्त्वाचे !
आताही आपण आपली भूमिका परत एकदा पडताळून पहाण्यास उशीर झालेला नाही. केवळ तत्त्वज्ञान आणि मानवता यांच्याविषयी काळजी करण्यापेक्षा अनेक प्रसंगांमध्ये वेळोवेळी आपल्याला साहाय्य करणार्या इस्रायलला प्रतिसाद देणे, हे आपले कर्तव्य आहे. या वेळी आपण इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. आपले इस्लामी राष्ट्रांशी असलेले राजकीय संबंध आणि त्यांनी आपल्या (भारताच्या) पंतप्रधानांवर केलेला पुरस्कारांचा वर्षाव यांमुळे आपली सद़्सद्विवेकबुद्धी विचलित होता कामा नये.
– अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.