शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे मराठा समाजाचे आरक्षण जाऊन ते तेली आणि माळी समाजाला मिळाले !

  • जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांचा आरोप

  • मराठ्यांचे भविष्य गाडल्याचा दावा !

प्रा. नामदेवराव जाधव व शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे मराठा समाजाचे आरक्षण जाऊन ते तेली आणि माळी समाजाला मिळाले आहे, असा दावा जिजाऊंचे वंशज प्रा. नामदेवराव जाधव यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी केला. ते येथे एका मराठी ‘ऑनलाईन’ वृत्तपत्राशी संवाद साधत होते. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जाधव यांनी आमरण उपोषण केलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचेही समर्थन केले आहे.

प्रा. नामदेवराव जाधव पुढे म्हणाले की,

१. शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घालवले. सूचीतील १८१ व्या क्रमांकावर जे मराठे होते, त्यावर फुली मारली गेली. त्यामुळे १८२ आणि १८३ क्रमांकावर असणार्‍या तेली अन् माळी समाज यांचा आरक्षणात समावेश करण्यात आला.

२. इतर मागासवर्गियांची पहिली सूची लागू झाली, तेव्हा त्यात १८० जाती होत्या. सुधारित सूचीत १८१ व्या क्रमांकावर मराठा, १८२ व्या क्रमांकावर तेली आणि १८३ व्या क्रमांकावर माळी होते. मग १८१ वा क्रमांक बेपत्ता कसा झाला ?

३. आरक्षणात लेवा पाटील, लेवा कुणबी आणि लेवा पडीदार या ३ जातींचा समावेश करण्यात आला, त्या वेळी त्यांच्याकडून कोणती कागदपत्रे घेण्यात आली होती का ? या प्रकरणी आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध झाले होते का ? शरद पवार यांनी त्यांच्या काळात हे आरक्षण १४ वरून २७ टक्क्यांवर नेेले. त्यांनी मराठा समाजाला डावलून तेली आणि माळी या २ जातींचा इतर मागासवर्गियांत समावेश केला.