इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी स्थगित केले आत्मचरित्राचे प्रकाशन !

इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्या संदर्भामुळे वाद झाल्याने घेतला निर्णय !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ (चंद्र प्यायलेला सिंह) हे मल्याळम् भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते; मात्र हे प्रकाशन त्यांनी स्थगित केले आहे. या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. परिणामी त्यांनी प्रकाशन स्थगित केले. एस्. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये के. सिवन (इस्रोचे माजी अध्यक्ष) यांनी हस्तक्षेप केला होता, असा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी एस्. सोमनाथ म्हणाले की, पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रती कुणाला तरी दिल्या असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीका करण्यासाठी नाही, तर लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिले आहे ! – एस्. सोमनाथ

एस्. सोमनाथ म्हणाले की, मी या पुस्तकातून कुणालाही व्यक्तीशः लक्ष्य केलेले नाही. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एखाद्या संस्थेत पद मिळवण्याकरताही अनेक आव्हाने असतात. ही आव्हाने प्रत्येकाला झेलावी लागतात. एकाच पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात. मी हेच सूत्र  पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी यासंदर्भात कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केलेले नाही. जीवनातील आव्हाने आणि अडथळे यांचा सामना करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिले असून कुणावरही टीका करण्याकरता लिहिलेले नाही, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.