४ जण अद्याप बेपत्ता !
रायगड – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात ३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ‘ब्लू जेट हेल्थकेअर फार्मा’ आस्थापनात स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत ७ जण ठार, तर ७ जण घायाळ झाले आहेत. या घटनेला २४ घंटे उलटले, तरी ४ जणांचा शोध लागलेला नाही. गॅस गळतीमुळे आस्थापनात ठेवलेल्या केमिकलचा लागोपाठ स्फोट झाला. त्यानंतर आगीने उग्र रूप धारण केले. अग्नीशमन दल आणि स्थानिक पोलीस यांनी आग आटोक्यात आणली. आस्थापनाने या घटनेवर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.