‘इन्फोसिस’ या जगप्रसिद्ध भारतीय आस्थापनाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ‘‘भारतीय तरुणांनी आठवड्याला किमान ७० घंटे, म्हणजेच प्रतिदिन १० घंटे काम केले पाहिजे.’’ सर्वसाधारणपणे कार्यालये आणि अन्य कामांच्या ठिकाणी १० ते १२ घंटे असे कामाचे स्वरूप असते; परंतु ‘संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी खरोखरच तितके घंटे कामे करतात का ?’, हा प्रश्नच आहे; कारण बहुतांश ठिकाणी खाणे-पिणे, मौजमजा करणे, भ्रमणभाषवर वेळ घालवणे, हे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे साहजिकच कामाचे घंटे न्यून किंवा अत्यल्प होत असावेत. असे असेल, तर मग या १० घंट्यांचे गणित कसे काय बांधले जाऊ शकते ? जरी एखाद्याकडून १० ते १२ घंटे काम होत असेल, तरी त्याच्या मनात स्वतःच्या स्वार्थाचाच विचार अधिक प्रमाणात असतो. ‘मी हे काम माझ्या पोटापाण्यासाठी वा कुटुंबासाठी करत आहे. यातून पैसे मिळवून मला माझे आयुष्य सुखी करायचे आहे’, असेच विचार मनात अधिक प्रमाणात असतात. भारतातील किती तरुणांच्या मनात ‘मी हे काम राष्ट्रोत्कर्षासाठी करत आहे’, असा विचार असतो ? हाताच्या बोटांवर मोजता येईल, असेच त्याचे उत्तर असेल. नोकरी-धंदा यातून स्वार्थ साधण्याची मनोवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे त्या कामालाही खर्या अर्थाने न्याय मिळतो, असे होत नाही.
नारायण मूर्ती यांच्या विधानावर आक्षेप घेत ‘क्युअर फिट’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश बंसल म्हणाले, ‘‘लोकांना पुरेसे वेतन मिळत नसेल, तर त्यांच्याकडून ७० घंटे काम करण्याची अपेक्षा करू शकत नाही.’’ प्रायोगिकदृष्ट्या त्यांचे विधान खरे असेलही; कारण आज वेतन अल्प देऊन नोकरवर्गाची पिळवणूक केली जाते. त्यामुळे त्यातून समाधान किंवा आनंद कसा मिळणार ? कामाचा योग्य तो मोबदला प्रत्येकाला मिळण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अधिकार्यांनीही कर्मचार्यांची आर्थिक पिळवणूक न करता त्यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा अन् कर्मचारी किंवा कुणाच्या हाताखाली काम करणार्यांनीही स्वतःचे दायित्व लक्षात घेत कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, असा विचार प्रत्येकाने बाळगला, तर देशाचा उत्कर्ष दूर नाही, हे लक्षात घ्यायला हवे !
काँग्रेस उत्तरदायी !
‘तरुण पिढीमध्ये निर्माण झालेल्या या स्वार्थी मनोवृत्तीला देशावर ६० वर्षे राज्य केलेले काँग्रेस सरकार उत्तरदायी आहे’, असे म्हटले, तर ते योग्यच ठरेल; कारण काँग्रेसने नीतीमूल्ये, संस्कार, परंपरा, संस्कृती हे सर्व हद्दपारच केले. त्यामुळे तरुण पिढीमधील स्वाभिमान हळूहळू नष्ट होऊ लागला. परिणामी ‘देशासाठी काहीतरी करायला हवे’, हा विचारच मनातून पुसला गेला. देशसेवा करायची, ती केवळ सैनिकांनी ! बाकीच्यांनी ‘मी आणि माझे कुटुंब, असा विचार करायचा’, हीच मानसिकता वाढत गेली. साहजिकच याचे रूपांतर कामचुकारपणा आणि वेळ वाया घालवणे यांत झाले. तरुण पिढीतील तेज, ओज, बल हे न्यून होऊ लागले. याचा परिणाम केवळ तरुणांवरच नाही, तर सध्याची लहान मुलेही दुर्बल आणि बलहीन होऊ लागली आहेत. पाणी घेण्यासाठी जागेवरून उठण्याचे कष्टसुद्धा ही मुले घेत नाहीत, त्यासाठी पालकांना ‘फर्मान’ (आदेश) सोडतात. आई-वडिलांकडून स्वतःचे हात-पाय दाबून घेतात. असे असेल, तर देशाचा उत्कर्ष होणार कि अधोगती ? याचा विचार पालक, विद्यार्थी, तरुण पिढी अशा सर्वांनीच करायला हवा. नारायण मूर्ती यांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठीचा मूलमंत्र मिळाला आहे. त्याचा सर्वांनी अवलंब करायला हवा.
नारायण मूर्ती यांचे अनुकरण करा !
सध्याच्या काळात अनाहूत सल्ला देणारे आणि मोठमोठ्या बाता मारणारे अनेक जण असतात; पण अशी माणसे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान; पण स्वतः मात्र कोरडे पाषाण’, ही म्हण सार्थ ठरवतात. त्यामुळे नारायण मूर्ती यांचे विधान ऐकल्यावर काही तरुणांच्या मनात प्रश्नही निर्माण झाला असेल की, स्वतः मूर्ती यांनी तरी इतके घंटे काम केले आहे का ? प्रत्यक्षात तरुणाईने याविषयीचे सत्य जाणून घ्यायला हवे. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सौ. सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘‘नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० घंटे काम करतात. त्यांनी त्यापेक्षा कधीही न्यून घंटे काम केलेले नाही आणि तसे त्यांना ठाऊक नाही. त्यांचा खर्या मेहनतीवर विश्वास आहे. ते अशाच पद्धतीने त्यांचे आयुष्य जगले आहेत.’’ प्रतिदिन १० घंटे काम करणे, हे आजच्या तरुणांसमोर मोठे आव्हानच आहे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उक्तीनुसार नारायण मूर्ती यांचे आजच्या तरुणांनी अनुकरण केले, तर ते ज्या पद्धतीने यशाच्या शिखरावर पोचले आहेत, त्याच पद्धतीने तरुणांचाही उत्कर्ष साधला जाईल, हे निश्चित !
आदर्श समोर ठेवा !
घंटोन्घंटे काम करून यश संपादन केल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मन नागरिकांनीही अनेक घंटे काम केल्याने ते मोठ्या संकटातून पुन्हा स्वबळावर उभे राहिले आणि देशाला बलवान करू शकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिदिन १४ ते १६ घंटे काम करतात. स्वतः नारायण मूर्ती यांचे वडीलही प्रतिदिन १४ घंटे काम करायचे. वडिलांकडून आलेला वारसा त्यांनी जपला, जोपासला आणि देशाला उद्बोधन करून तो वृद्धींगतही केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष बालवयापासूनच झपाटल्यासारखे कार्य करत होते; कारण त्यांच्यात स्वाभिमानाचे सामर्थ्य होते. ते जर हातावर हात ठेवून बसून राहिले असते, तर आज आपली परिस्थिती काय झाली असती ? याची कल्पनाच न केलेली बरी ! तरुणांच्या मनगटात बळ अन् सामर्थ्यही आहे. तरुणांनी संघटित प्रयत्न करून राष्ट्रोत्कर्षाचे महत्कर्तव्य आणि ‘भारताला महासत्ता बनवणे’, हे व्यापक ध्येय बाळगून कार्यतत्पर व्हावे !