‘माय लॉर्ड ’ म्हणणे बंद केल्यास माझे अर्धे वेतन देईन !

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्यांना केले आवाहन !

न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह्मा

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह्मा यांनी एका सुनावणीच्या वेळी त्यांना ‘माय लॉर्ड’ (माझे स्वामी) हा शब्द न वापरण्यास अधिवक्तांना सांगितले. न्यायमूर्ती अधिवक्त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही किती वेळा मला ‘माय लॉर्ड’ म्हणणार ? तुम्ही मला माय लॉर्ड म्हणणे बंद करा, नाहीतर मी ते मोजणे चालू करीन. जर तुम्ही माय लॉर्ड म्हणणे बंद केले, तर मी माझे अर्धे वेतन तुम्हाला देईन. तुम्ही ‘माय लॉर्ड’ऐवजी मला ‘सर’ असे का म्हणत नाहीत ?’’

यापूर्वी देहली उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती रवींदर भट्ट आणि मुरलीधर, तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रु यांनी त्यांच्या कक्षाबाहेर ‘माय लॉर्ड’ शब्दाचा वापर न करण्याची सूचना लिहिली होती.

ब्रिटीश काळापासून होत आहे वापर !

ब्रिटीश काळापासून न्यायमूर्तींना ‘माय लॉर्ड’ म्हणण्याची परंपरा आहे. वर्ष २००६ मध्ये भारतीय विधीज्ञ परिषदेने प्रस्ताव संमत करत या शब्दावर बंदी घातली होती. हा निर्णय भारतीय राजपत्रातही प्रकाशित करण्यात आला होता. तरीही अद्याप या शब्दाचा वापर केला जात आहे. चित्रपटांतही याचा वापर केला जातो.

संपादकीय भूमिका

अशा शब्दांवर आतापर्यंत अधिकृत बंदी का घालण्यात आली नाही ?