रुद्राक्षांच्या आधारे बनवलेल्या औषधांद्वारे कर्करोगावर होणार उपचार !

  • उंदरांवरील प्रयोग यशस्वी

  • आता बनारस विश्‍वविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांवर होणार प्रयोग

मेरठ (उत्तरप्रदेश) – रुद्राक्षांपासून बनवलेल्या औषधांचा परिणाम कर्करोगावरील उपचारांसाठी करता येऊ शकतो का ?, या संशोधनासाठी देहलीतील शोभित विश्‍वविद्यालयाचे संशोधक बनारस हिंदु विश्‍वविद्यालयासमवेत काम करण्याच्या सिद्धतेत आहेत. शोभित विश्‍वविद्यालयाकडून या संदर्भात प्रथम उंदरांवर प्रयोग करण्यात आले असून त्याला यश मिळाले आहे. आता बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्या संदभातील अनुमतीची प्रक्रिया चालू आहे.

कोणतेही दुष्परिणाम (साईड इफेक्टस) नाहीत !

शोभित विश्‍वविद्यालयाचे डॉ. शिवा शर्मा, डॉ. मनीषा शर्मा, मिलिन सागर आणि प्रशांत पांडेय यांनी हे संशोधन केले. या संशोधकांचा दावा आहे की, रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रो मॅग्नेटिक एनर्जी आणि फाइटो केमिकल्स (एल्केलॉइड, फिनोलिक आणि फ्लेवेनोइड्स) यांचा समावेश आहे. फाइटो केमिकल्सचा परिणाम किमोथेरेपीसारखा होतो; मात्र याचे दुष्परिमाम (साईड इफेक्टस) होत नाही, जसा किमोथेरेपीमुळे होतो. रुद्राक्षाचा कर्करोगावरील उपचारांच्या प्रयोगाचे पुष्कळ सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.

डॉ. शिवा शर्मा यांनी सांगितले की, रुद्राक्ष केवळ धारण केल्यानेच नाही, तर औषधाच्या स्वरूपातही लाभदायी आहे. २६ तत्त्वांनी युक्त रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रो मॅग्नेटिक फील्ड मनुष्याच्या बायो इलेक्ट्रोसिटीच्या संपर्कात आल्यानंतर हीलिंग थेरेपीचे काम करतो. यामुळे रक्तदाब, तणाव आदींपासून दिलासा मिळतो. यामध्ये लाभदायी फाइटो केमिकल्स आहेत. ते कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहेत. त्यांची क्षमता आणि प्रभाव किमोथेरेपीसारखे आहे. किमोथेरेपीमध्ये केस गळणे, तहान-भूक न लागणे, अस्वस्थता, भीती आदी दुष्परिणाम दिसतात. रुद्राक्षातील फाइटो केमिकल्समुळे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत.

१० उंदरांवर झाले यशस्वी संशोधन !

रुद्राक्षांतील फाइटो केमिकल्सचे परीक्षण कर्करोगपीडित १० उंदरांवर करण्यात आले. याविषयी डॉ. शिवा शर्मा यांनी सांगितले की, या उंदरांना दिवसातून ३ वेळा फाइटो केमिकल्सद्वारे बनवलेल्या औषधांचे डोस देण्यात आले. प्रत्येक १५ दिवसांनी त्यांचे निरीक्षण करण्यात आले. या काळात त्यांची तहान-भूक अल्प झाली नाही. यकृत, मूत्रपिंड आणि पचन यंत्रणा नीट होती. काही काळानंतर सर्व उंदीर कर्करोगमुक्त झाले.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’कडून कौतुक

बेंगळुरू येथे झालेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या संमेलनात या संशोधनाचे कौतुक करण्यात आले. या संशोधनाला ‘सर्वोत्कृष्ठ संशोधन’ असे गौरवण्यात आले.