जुन्या नोंदी आढळल्यास कुणबी दाखले देऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा उपसमितीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मराठा समाजाच्या कुणबी असल्याच्या नोंदी पडताळण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने १ कोटी ७३ लाख कागदपत्रे पडताळली. त्यांत या समितीला ११ सहस्र ५३० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. याविषयीचा अहवाल समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा अहवाल स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री आणि संबंधित तहसीलदार अन् जिल्हाधिकारी यांच्यात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे चर्चा होणार आहे. ‘ज्यांच्या जुन्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांची कागदपत्रे तात्काळ तपासून त्यांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल’, असे मराठा उपसमितीच्या बैठकीत सांगण्यात आले. याविषयीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेऊन स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी, तसेच मराठा आंदोलकांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘या प्रकरणी लवकरच  मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल’, असेही आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.