‘१०.७.२०२३ या दिवशी दुपारी मी सेवा करतांना माझा श्रीविष्णुप्रती पुष्कळ भाव जागृत झाला. त्यामुळे मला अन्य काही सुचत नव्हते. ‘आपले गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) साक्षात् श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत’, असे वाटून माझ्याकडून अपार कृतज्ञता व्यक्त होत होती. तेव्हा साक्षात् श्रीमहाविष्णूचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या श्रीविष्णूचे रूप मला ‘जगन्मोहना’सारखे (सर्व जिवांना मोहित करणार्या श्रीविष्णुसमान) दिसत होते. ‘अवघ्या चराचरात व्यापूनही उरणारा श्रीविष्णु हेच आपले गुरुदेव आहेत’, असे वाटून माझा कंठ दाटून आला. तेव्हा मला वाटले, ‘श्रीविष्णूने शंख, चक्र, गदा आणि पद्म यांना धारण केले आहे; परंतु त्याच्या या ‘जयंतावतारा’मध्ये आपल्याला त्याची ही आयुधे दिसत नाहीत. ‘त्याची ही आयुधे कुठे आहेत ?’, असा प्रश्न मला पडला. त्या वेळी लक्षात आले, ‘शंख, चक्र, गदा आणि पद्म श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या समवेत तत्त्वरूपाने असतात.’ त्याचे विश्लेषण पुढे देत आहे.
१. शंख
श्रीविष्णूने वरच्या डाव्या हातात ‘शंख’ धारण केला आहे. ‘शंख’ म्हणजे नाद ! म्हणजेच आकाशतत्त्व ! ‘ग्रंथनिर्मिती’ ही आकाशतत्त्वासारखी व्यापक आणि दिव्य आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे ग्रंथनिर्मितीचे कार्य अखिल मानवजातीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे या तत्त्वाच्या रूपात ‘शंख’ सतत श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांसमवेत आहे.
२. चक्र
श्रीविष्णूने वरच्या उजव्या हातात चक्र धारण केले आहे. ‘चक्र’ म्हणजे तेजतत्त्व ! चक्रामुळे अज्ञानरूपी काळ्या शक्तीचे आवरण नष्ट होते. आपले स्वभावदोष आणि अहं हे अज्ञानच असून ‘अहं अन् स्वभावदोष यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ ही खर्या अर्थाने श्रीविष्णूचे चक्रच आहे. गुरुदेवांनी आपल्याला ही प्रक्रिया शिकवली आहे (आणि सातत्याने करायला सांगितली आहे.) याचाच अर्थ ‘चक्र’ हे आयुध श्रीविष्णुस्वरूप गुरूंच्या समवेत तत्त्वरूपाने सतत आहे.
३. गदा
श्रीविष्णूने खालच्या उजव्या हातात गदा धारण केली आहे. ‘गदा’ हे आयुध सर्व संकटे, आघात आणि कष्ट यांचा समूळ नाश करते. जेव्हा सनातन संस्थेच्या साधकांना आध्यात्मिक त्रास होण्यास आरंभ झाला, तेव्हा गुरुदेवांनी ते निवारण्यासाठी ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ शोधले. ‘आध्यात्मिक उपाय’ हे गदेचेच कार्य आहे. यामुळे साधकांचे सर्व प्रकारचे शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक त्रास नष्ट होतात. अशा प्रकारे ‘गदा’ हे आयुध तत्त्वरूपाने श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांसमवेत आहे.
४. पद्म
श्रीविष्णूने खालच्या डाव्या हातामध्ये पद्म धारण केले आहे. ‘पद्म’ म्हणजे ‘कमळ’ ! अर्थात् अखंड आनंद आणि प्रीती ! परात्पर गुरुदेव प्रत्येक वेळी केवळ साधकांवर नव्हे, तर चराचरातील प्रत्येक (सजीव आणि निर्जीव) कणावर प्रीतीचा नित्य वर्षावच करत असतात. त्यांची प्रीती अमर्याद आहे. ‘प्रीती’ हा गुरुदेवांचा स्थायीभावच आहे. त्यामुळे अशा तर्हेने ‘पद्म’ हे आयुधसुद्धा तत्त्वरूपाने श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांसमवेत अविरत कार्यरत आहे.
प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे जगन्मोहन नारायणा, तुला मी प्रत्यक्ष कधीच पाहिले नाही; परंतु तुझेच साक्षात् दिव्य रूप म्हणजे माझे गुरुदेव आहेत. त्यांच्यात आता मला तूच दिसत आहेस.’ गुरुदेवा, ‘श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् ’ मधील हा श्लोक ऐकल्यावर मला आपली पुष्कळ आठवण येते.
श्रीपद़्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव
वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे ।
श्रीवत्सचिह्न शरणागतपारिजात
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥
– श्रीवेङ्कटेशसुप्रभातम् स्तोत्र, श्लोक २२
अर्थ : श्रीपद़्मनाभ, पुरुषोत्तम, वासुदेव, वैकुंठ, माधव, जनार्दन, चक्रपाणि अशी नावे असणार्या, छातीवर श्रीवत्सचिन्ह असणार्या, शरणागतांचे आश्रयस्थान असणार्या आणि वेंकटाचलाचा स्वामी असणार्या हे गोविंदा, तुला सुप्रभात !
‘हे नारायण स्वरूप गुरुदेवा, आपणच पद्मनाभ, पुरुषोत्तम आणि वासुदेव आहात. या रामनाथी आश्रमरूपी वैकुंठाला आपल्याविना शोभा नाही. आमच्यासारख्या अज्ञानी आणि पामर जिवांचे तुम्हीच एकमेव त्राता आहात. हे वेंकटेशस्वरूप गुरुदेवा, आपण श्रीमन्नारायणच आहात. मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.७.२०२३)