इस्रायल आणि हमास यांच्‍या युद्धाचे खरे स्वरूप अन त्यातील षडयंत्र !

सध्‍या चालू असलेल्‍या इस्रायल आणि हमास यांच्‍यामधील युद्धामध्‍ये आता इतर देशही सहभागी होत आहेत. सीरिया आता इस्रायलवर बाँबची आक्रमणे करत आहे, तसेच लॅबेनॉनमधून हिजबुल्‍ला गटाचे आतंकवादी इस्रायलवर आक्रमणे करत आहेत. इस्रायल या सर्वांचा सामना करत आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात करत आहे.

गाझा शहरातील उद़्‍ध्‍वस्‍त झालेले हेच ते रुग्‍णालय (छायाचित्र साभार : ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्‍था)

१. तुर्कीये आतंकवादाचे नवीन द्वार आणि त्‍याचे खरे स्‍वरूप

बहुतांश जागतिक सत्ता इस्रायलला पाठिंबा देत आहेत; परंतु तुर्कीयेचे राष्‍ट्रपती एर्दोगॉनसारखे नतद्रष्‍टही आहेत की, जे ‘हमास’सारख्‍या आतंकवादी संघटनेला पाठिंबा देत आहेत. तुर्कीये हा युरोपियन युनियनचा सदस्‍य आहे. युरोपियन युनियनने (ज्‍यामध्‍ये अमेरिकेचा समावेश आहे) हमासला ‘आतंकवादी’ म्‍हणून घोषित केले आहे. असे असले, तरी तुर्कीये हा हमासला पाठिंबा देत आहे. तुर्कीयेमध्‍ये हमासच्‍या प्रतिनिधींना बोलवले जाते. तुर्कीये म्‍हणतो, ‘‘तुमचे (हमासचे) आमच्‍या संसदेत स्‍वागत आहे. तुम्‍ही आमच्‍या संसदेत पत्रकार परिषद घेऊ शकता.’’ त्‍यामुळे तुर्कीये या सर्वांत वाईट अशा आतंकवादाला पाठिंबा देत आहे.

भारतामधून विशेषतः केरळमधून बहुतांश लोक ‘इस्‍लामिक स्‍टेट’मध्‍ये (‘इसिस’मध्‍ये) सामील होण्‍यासाठी गेले होते. ते सर्वजण हताश होऊन परत आले. त्‍यामधील काही जण तिथेच मृत पावले, तर काही जण भारतात परत आले. हे सर्वजण तुर्कीयेमधून तिथे गेले होते. त्‍यामुळे तुर्कीये हे आतंकवादाचे नवीन द्वार आहे. एर्दोगॉन हे कट्टर इस्‍लामी आहेत आणि ते सतत हमासला पाठिंबा देत आहेत. एर्दोगॉन म्‍हणतात, ‘‘हमासच्‍या आक्रमणाला इस्रायलनने दिलेले उत्तर हे योग्‍य प्रमाणात नाही.’’ खरेतर यामध्‍ये प्रमाणात असण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. जर कुणी तुमच्‍यावर बंदूक झाडली, तर प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी तुम्‍ही त्‍यापेक्षा प्रभावी हत्‍यार वापरणार. जर कुणी रायफल झाडली, तर तुम्‍ही प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी मशीन गनचा वापर करणार. एखाद्याने मशीन गनने आक्रमण केले, तर त्‍याला उत्तर देण्‍यासाठी ‘मोर्टर’ वापरणार. जर ‘मोर्टर’ने आक्रमण झाले, तर त्‍याला उत्तर देण्‍यासाठी ‘रॉकेट लाँचर’चा उपयोग करणार. कुणी ‘रॉकेट लाँचर’ वापरले, तर त्‍याला उत्तर देण्‍यासाठी मोठ्या तोफा वापरणार. यालाच ‘युद्ध’ म्‍हणतात, तसेच याला ‘वरवर चढत जाणे’, असे म्‍हणतात.

मेजर गौरव आर्य

२. पाकिस्‍तान आणि तुर्कीये यांची चुकीची बाजू अन् हमासचे क्रौर्य

इस्रायलने सर्व दृष्‍टीने सिद्धता केली आहे. त्‍यामुळे गाझा आता मार खात आहे. इस्रायल त्‍याला आता जीवनभर आठवणीत राहील, असा धडा हमासला शिकवणार आहे आणि हे चालू राहिल. त्‍यामुळेे पाकिस्‍तान आणि तुर्कीये या देशांनी चुकीची बाजू घेऊ नये, याची जाणीव त्‍यांना झाली पाहिजे. ते आतंकवादाला पाठिंबा देत आहेत. ते यापासून वेगळे आहेत, अशी त्‍यांची समजूत आहे.

हमासने जे काही केले आहे, त्‍याला जग कधीच क्षमा करणार नाही. हमासने लहान मुलांच्‍या हत्‍या केल्‍या, म्‍हणजे खरोखरच त्‍या लहान मुलांना गोळ्‍या घालून ठार मारले. जर रॉकेट पडून एखादे मूल दगावले, तर ती तेवढीच वाईट गोष्‍ट आहे; परंतु ते रॉकेट कदाचित् चुकून जरी पडले आणि ते मूल दगावले, असे त्‍याचे स्‍पष्‍टीकरण देता येईल. जेव्‍हा एखाद्या २ वर्षांच्‍या लहान मुलाला बांधले जाते, त्‍याला गोळ्‍या घातल्‍या जातात आणि त्‍यानंतर त्‍याला जाळले जाते, याचे स्‍पष्‍टीकरण काय देणार ? एवढे क्रौर्य असूनही एर्दोगॉनसारख्‍या माणसाला हे योग्‍य वाटते.

३. हमासने इस्रायलवर सोडलेले रॉकेट परत उलटून रुग्‍णालयावर पडणे

इस्रायल आणि हमासमध्‍ये चालू असलेल्‍या युद्धात हमासमध्‍ये एका रुग्‍णालयावर झालेल्‍या रॉकेटच्‍या आक्रमणामुळे जवळजवळ ५०० लोक ठार झाले. या रुग्‍णालयात अधिकतर सर्व रुग्‍ण होते आणि अनुमाने १० टक्‍के डॉक्‍टर्स अन् परिचारिका होत्‍या. दुर्दैवाने या सर्वांचा मृत्‍यू झाला. या घटनेनंतर असे आक्रमण केल्‍याविषयी हमास इस्रायलला दोषी ठरवत होता, तर इस्रायल हमासला दोष देत होता. यानंतर इस्रायलने हमासच्‍या आतंकवाद्यांमध्‍ये झालेल्‍या संभाषणाची एक ध्‍वनीचित्रफित ‘एक्‍स’वरून (पूर्वीचे ट्‍विटर) प्रसारित केली; कारण इस्रायलकडे सर्व अत्‍याधुनिक यंत्रणा आहे. इस्रायलचे म्‍हणणे आहे की, हे रॉकेट गाझामधून इस्रायलयच्‍या दिशेने सोडण्‍यात आले होते; परंतु मध्‍येच त्‍याचा स्‍फोट होऊन ते या रुग्‍णालयावर कोसळले आणि त्‍यात ५०० लोकांचा मृत्‍यू झाला.

४. हमासचे रॉकेट रुग्‍णालयावर पडणे – इस्रायलच्‍या विरोधातील एक षड्‍यंत्र

अशाच प्रकारची घटना भारतात घडली होती. अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बिल क्‍लिंटन यांनी वर्ष २००० मध्‍ये भारताला भेट दिली होती. त्‍या वेळी काश्‍मीरमध्‍ये चिटीसिंगपुरा येथे ३६ लोकांना घराबाहेर काढून त्‍यांच्‍यावर गोळ्‍या झाडून त्‍यांची हत्‍या करण्‍यात आली होती. शाहीनबागविषयीही असेच घडले आहे. शाहीनबागमधील आंदोलन जवळ जवळ एक वर्षभर चालू होते; परंतु भारतात आलेले अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रंप परत गेले, त्‍यानंतर अवघ्‍या २४ घंट्यात हे आंदोलन मागे घेतले गेले. याचा अर्थ हे सर्व केवळ जगाला दाखवण्‍यासाठी आणि सर्व जगाकडून सहानुभूती मिळवण्‍यासाठी आंदोलन केले जात आहे. हे रॉकेट इस्रायलच्‍या दिशेने सोडण्‍यात आले होते आणि ते कोसळले, या अफवेवरही माझा विश्‍वास नाही. माझे म्‍हणणे आहे की, ही इस्‍लामी जिहादने केलेली बनावट (खोटी) कारवाई आहे. त्‍यांना स्‍वतःच्‍याच लोकांना मारून त्‍याचा दोष इस्रायलच्‍या माथी मारायचा होता. प्रसारमाध्‍यमे सांगत आहेत की, इस्रायलयने या निष्‍पाप लोकांना मारले; परंतु इस्रायल असे का करील ? कोणत्‍याही व्‍यावसायिक लष्‍कराचे लक्ष्य हे लष्‍करी ठिकाण असते. रुग्‍णालय हे इस्रायलचे लक्ष्य कसे असू शकते ? इस्रायल असे कधीच करणार नाही. व्‍यावसायिक लष्‍कर आणि कुठली तरी हमाससारखी आतंकवादी संघटना यांत हाच भेद आहे. त्‍यांची मूल्‍ये वेगवेगळी आहेत. त्‍यामुळे यामध्‍ये इस्रायल दोषी आहे, असे मला वाटत नाही.

– मेजर गौरव आर्य (निवृत्त)

(मेजर गौरव आर्य यांच्‍या ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून साभार)


इस्रायलवरील आक्रमणातून भारताने वेळीच सावध होण्‍याची आवश्‍यकता !

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

‘हमासने इस्रायलवर आक्रमण केले. यात इस्रायलची गुप्‍तहेर संस्‍था ‘मोसाद’चे अपयश प्रामुख्‍याने पुढे येते. त्‍यांना या आक्रमणाविषयी कुठलीही माहिती नव्‍हती. यामागे एक कारण आहे. तेथे घरकाम करण्‍यासाठी मोलकरीण आणि अन्‍य कामे करण्‍यासाठी कारागीर यांची कमतरता होती. त्‍यातही गवंडी, विद्युत् काम, रस्‍ते दुरुस्‍ती करणारे इत्‍यादी कामे करणार्‍यांची आवश्‍यकता होती. त्‍यासाठी गाझा पट्टीतून प्रतिदिन अनुमाने १५ सहस्र महिला आणि कारागीर यांना इस्रायलमध्‍ये प्रवेश मिळायचा. ते सर्व घरोघरी कामे करायचे. त्‍यामुळे त्‍यांना घरे आणि परिसर यांची पूर्ण माहिती मिळत होती. या माहितीच्‍या आधारे हमासने इस्रायलचा घात केला आहे. हाच धोेका भारतालाही आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका

इस्रायलवर झालेल्‍या आक्रमणातून बोध घेऊन भारताने रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांना तात्‍काळ हाकलणे महत्त्वाचे !