पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

सर्वत्रच्या निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची माहिती !

‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविषयीची माहिती पुढे दिली आहे.

१. जीवन प्रमाणपत्र कुठे द्यावे ?

१ अ. संबंधित अधिकोषाच्या कोणत्याही शाखेतून ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ देता येईल ! : प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेत खाते उघडले आहे, त्या शाखेत प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची जी शाखा असेल, तेथे पुढील कागदपत्रे दाखवून ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ देता येते, उदा. एखाद्याने निवृत्तीवेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो प्रमाणपत्र देऊ शकतो.

१ आ. शासकीय आणि अशासकीय सुविधा पुरवण्यासाठी काही ठिकाणी ‘कॉमन सर्व्हिस सेंटर्स’ चालू झाली आहेत. तेथे, तसेच पोस्टातही जीवन प्रमाणपत्र देता येते. आपल्या परिसरात असलेल्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर्स’ची माहिती https://locator.csccloud.in/ या संकेतस्थळावर मिळेल.

२. आवश्यक कागदपत्रे

अ. आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स प्रत

आ. निवृत्तीवेतन जमा होणार्‍या खात्याचे पासबुक

इ. पेन्शन पेमेंट ऑर्डर (पी.पी.ओ.) क्रमांक

त्यानंतर अधिकोषातील अधिकारी निवृत्तीवेतन धारकांना प्रमाणपत्र देण्याची पुढील प्रक्रिया करतील.

ई. अधिकोषात अथवा ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मध्ये जातांना समवेत आधार कार्डासाठी पंजीकृत (रजिस्टर) केलेला आपला संपर्क क्रमांक समवेत असावा.

यानंतर संगणकावर ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ सिद्ध होते आणि निवृत्तीवेतन देणार्‍या संबंधित संस्थेकडे ते जमा होते. याची छापील प्रत निवृत्तीवेतन धारकांनाही मिळते. ती प्रत निवृत्तीवेतन धारकांनी स्वतःकडे ठेवावी.

याविषयीच्या अधिक माहितीसाठी https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या अथवा संबंधित अधिकोष किंवा जवळचे टपाल कार्यालय यांच्याशी संपर्क साधा !

३. आपल्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ देण्याची सुविधा उपलब्ध !

टपाल कार्यालयाच्या (‘पोस्ट ऑफिस’च्या) माध्यमातून पोस्टमन आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी येऊन त्यांच्या माध्यमातून ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ सिद्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि संपर्क क्रमांक आपल्या समवेत असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी टपाल कार्यालयाकडून नाममात्र शुल्क आकारले जाते. याविषयीच्या अधिक माहितीसाठी स्थानिक अथवा जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची घरपोच सेवा (डोअर स्टेप सर्व्हिस) काही राष्ट्रीयकृत अधिकोषांकडून (नॅशनल बँकांकडून) दिली जाऊ शकते. आपल्या संबंधित अधिकोषाशी संपर्क साधून याविषयी माहिती मिळवू शकतो.

४. भ्रमणभाषच्या माध्यमातून ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ देण्याची सुविधा उपलब्ध !

‘AadhaarFaceRd’ आणि ‘JeevanPramaan’ हे दोन ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ करून आपण स्वतःही आपले किंवा अन्य व्यक्तीचे जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो. दोन्ही ‘ॲप’ भ्रमणभाषमध्ये ‘इंस्टॉल’ केल्यावर ‘JeevanPramaan’ हे ‘ॲप’ उघडावे आणि त्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे माहिती भरावी.

काहींना भ्रमणभाषमध्ये ही माहिती भरणे अवघड वाटू शकते. त्यासाठी आपण आपल्या जवळील एखाद्या जाणकार व्यक्तीचे साहाय्य घेऊ शकतो; जेणेकरून आपल्याला घरबसल्या प्रमाणपत्र जमा करता येईल.

५. निवृत्तीवेतन धारकांनी सादर केलेले ‘जीवन प्रमाणपत्र’ १ वर्षापर्यंतच वैध रहाते.

काही शासकीय कर्मचार्‍यांशी संबंधित निवृत्तीवेतन देणार्‍या संस्थांमध्ये ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झालेली असण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे त्या वेतनधारकांना पूर्वीप्रमाणे अधिकोषाच्या अधिकार्‍याची स्वाक्षरी असणारे प्रमाणपत्र द्यावे लागते. यासाठी संबंधित अधिकोषाच्या स्थानिक शाखेमध्ये स्वतःची वरील कागदपत्रे दाखवावीत आणि पुढील प्रक्रिया करावी.’

(२०.१०.२०२३)