शिर्डी (अहिल्‍यानगर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते विविध प्रकल्‍पांचे उद़्‍घाटन, भूमीपूजन आणि पायाभरणी !

निळवंडे धरण प्रकल्पाच्या ठिकाणी पूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिर्डी (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्‍टोबर या दिवशी महाराष्‍ट्राच्‍या दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यात त्‍यांनी जवळपास ५ वर्षांनंतर शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. त्‍यानंतर त्‍यांनी नगर जिल्‍ह्यातील विविध विकास प्रकल्‍पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईबाबांची आरती केल्‍यानंतर ते निळवंडे धरणाच्‍या दिशेने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निळवंडे धरणाच्‍या डाव्‍या कालव्‍याचे लोकार्पण केले. अनुमाने ५ सहस्र १७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे. त्‍यांच्‍या हस्‍ते अनेक विकास प्रकल्‍पांचे उद़्‍घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करण्‍यात आली.

या वेळी पंतप्रधानांनी मंदिरातील नवीन ‘दर्शन रांग संकुला’चेही उद़्‍घाटन केले. येथे १० सहस्रांहून अधिक भाविकांची बसण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या नवीन ‘दर्शन रांग संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांच्‍या हस्‍ते ऑक्‍टोबर २०१८ मध्‍ये करण्‍यात आली होती.

दुपारी पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते आरोग्‍य, रेल्‍वे, रस्‍ते यांसारख्‍या क्षेत्रातील अनुमाने ७ सहस्र ५०० कोटी रुपयांच्‍या अनेक विकास प्रकल्‍पांची पायाभरणी करण्‍यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ‘नमो शेतकरी महा सन्‍मान निधी योजने’चा शुभारंभ केला. या योजनेमुळे महाराष्‍ट्रातील ‘प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजने’च्‍या ८६ लाखांहून अधिक लाभार्थ्‍यांना प्रतिवर्ष ६ सहस्र रुपयांची अतिरिक्‍त रक्‍कम उपलब्‍ध करून दिली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी नगर सिव्‍हिल हॉस्‍पिटलमधील आयुष हॉस्‍पिटलसह अनेक विकास प्रकल्‍पांचे उद़्‍घाटन आणि त्‍याचे लोकार्पण केले.