तत्त्वनिष्‍ठता आणि सेवाभाव असलेल्‍या ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस !

आश्‍विन शुक्‍ल द्वादशी (२६.१०.२०२३) या दिवशी ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेल्‍या सौ. प्रियांका चेतन राजहंस यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांचे वडील आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांना सौ. प्रियांका यांच्‍याविषयी जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये खाली दिली आहेत.

सौ. प्रियांका चेतन राजहंस

१. प्रेमभाव

१ अ. प्रीतीमुळेच साधक आकर्षित होणे : ‘सौ. प्रियांका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करते. सेवा करतांना तिचा अनेक साधकांशी संपर्क येतो. पुष्‍कळ वेळा काही साधक सांगतात, ‘‘तिचे बोलणे लाघवी वाटते.’’ तिची प्रकृती बरी नसल्‍यावर साधक तिची आपुलकीने विचारपूस करतात. तिच्‍या प्रीतीमुळेच साधक तिच्‍याकडे आकर्षित होतात.

१ आ. कुटुंबियांची प्रेमाने आणि आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन देऊन विचारपूस करणे : ती आमची प्रेमाने चौकशी करते. ती आम्‍हाला आवश्‍यक तेव्‍हा आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन देते. यातून आम्‍हाला नेहमी लाभ होतो. ती आई-वडिलांच्‍या मायेत अडकत नाही. तिच्‍यामुळे आम्‍हाला साधनेत साहाय्‍य होत आहे.

१ इ. आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या साधकांना नामजपादी उपाय सांगून प्रेमाने साहाय्‍य करणे : सौ. प्रियांका आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या साधकांना नामजपादी उपाय कळवायची सेवा करते. त्‍या वेळी ती तत्‍परतेने सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून घेते आणि त्‍वरित साधकांना नामजप कळवते. नंतर ती त्‍या साधकांचा वेळोवेळी आढावा घेऊन तो सद़्‍गुरु गाडगीळकाकांना देते आणि नामजपात केलेले पालटही साधकांना त्‍वरित कळवते. ती साधकांची प्रेमाने विचारपूस करते.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

२. तत्त्वनिष्‍ठता

प्रियांका एखाद्याला सेवा देतांना किंवा एखादे सूत्र सांगतांना व्‍यवस्‍थित समजावून सांगते, तसेच ती साधकांकडून सेवा योग्‍य प्रकारे झाली किंवा नाही ? हे कटाक्षाने पहाते. त्‍यात काही उणीव असल्‍यास ती तत्त्वनिष्‍ठ राहून सांगते. एकदा एका साधिकेला आध्‍यात्मिक त्रास असतांना काही सूत्रे सांगणे आवश्‍यक होते. तेव्‍हा तिने त्‍या साधिकेला तत्त्वनिष्‍ठपणे आणि कसलाही संकोच न ठेवता सर्व सूत्रे सांगितली. त्‍या वेळी त्‍या साधिकेला आवडले नाही; पण नंतर त्‍या साधिकेला स्‍वतःची चूक लक्षात आली आणि तिला प्रियांकाविषयी कृतज्ञता वाटली.

३. प्रसंगांचा सखोल अभ्‍यास करून सोप्‍या भाषेत साधकांना दृष्‍टीकोन देणे

ती साधकांशी सोप्‍या शब्‍दांत आणि स्‍पष्‍टपणे बोलते. एखाद्याला दृष्‍टीकोन देतांना ती सखोल अभ्‍यास करून देते. त्‍या वेळी तिने व्‍यापक विचार केलेला असतो.

४. सेवाभाव

गुरूंच्‍या कार्यात कुठेही चूक होणार नाही, याची ती काळजी घेते. सेवा करतांना ती सेवेत हरवून जाते. तिला शारीरिक त्रास होत असला, तरी ती सेवेमध्‍ये नेहमी आनंदी असते.

५. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेल्‍या चुका स्‍वीकारून त्‍या चुका पुन्‍हा न होेण्‍यासाठी प्रयत्न करणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रियांकाला तिच्‍या साधनेतील चुकांची जाणीव करून देतात. प्रियांका आम्‍हाला त्‍या चुका आणि त्‍यांवरील दृष्‍टीकोन सहजतेने सांगते. त्‍या वेळी ती ‘प्रतिमा जपणे, स्‍वतःचे अस्‍तित्‍व सांभाळणे किंवा चूक टाळून उल्लेख करणे’, असे करत नाही. तिला चुकांची जाणीव करून देण्‍यात येते. तेव्‍हा ती जाणीव तिच्‍या अंतर्मनाला होते. पुढे ती तशा चुका टाळण्‍याचा प्रयत्न करते. ती चुका आनंदाने स्‍वीकारते. तेव्‍हा तिचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍याविषयी आदर वाढत असतो.

६. प्रियांकाला गुरूंनी त्‍यांच्‍या जवळ ठेवले आहे, यासाठी तिला कृतज्ञता वाटते.’

– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ६७ वर्षे) (सौ. प्रियांका यांचे वडील), फोंडा, गोवा. (१५.१०.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.