लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) : भाजपचे २८, मित्रपक्ष मगोपचे २ आणि अपक्ष ३ मिळून ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण गोव्याचे दायित्व असलेले केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स गोव्याबाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र इतर सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगोपचे नेते, तसेच राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीला केवळ १६० दिवसच शिल्लक राहिले आहेत आणि यामुळे आतापासूनच निवडणुकीची सिद्धता चालू करण्यात आली आहे. केंद्रशासनाच्या योजना गोव्यातील ९९ टक्के कुटुंबियांपर्यंत पोचल्या आहेत. गोवा देशातील पहिले ‘डिजिटल’ राज्य बनवण्याचा आमचा मानस आहे. केंद्राकडे यासाठी वेगळा निधी मागितला आहे.’’

केंद्रीय तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, ‘‘डबल इंजिन’ (‘डबल इंजिन म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर भाजपचे सरकार) सरकारमुळे गोव्याचा जलद गतीने विकास होत आहे. गोव्यातील जनतेने भाजप करत असलेला विकास पाहिला आहे आणि यामुळे गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.’’