(म्हणे) ‘आपल्या शक्तीचा वापर अंधश्रद्धायुक्त कर्मकांडे करण्यात वाया घालवू नका !’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक निकम यांची दर्पाेक्ती !

नवी मुंबई – आपल्या शक्तीचा वापर अंधश्रद्धायुक्त कर्मकांडे करण्यात वाया घालवू नका, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अशोक निकम यांनी तुर्भे गाव येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सानपाडा शाखेच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा’ अभियानांतर्गत ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर संवादसत्र घेण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

निकम पुढे म्हणाले की,

१. नवरात्रीमध्ये महिलेला देवीस्वरूप मानल्याचा भास होतो. (त्याला ‘भास होतो’, असे म्हणून अशोक निकम एकप्रकारे हिंदु धर्माची थट्टाच करत आहेत ! प्रत्येक भाविक महिलेला ‘आपण देवीस्वरूपच आहोत’, अशी आतून जाणीव असते, हे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पहाणार्‍या निकम यांना कसे दिसणार ? उपासक महिलांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असते, हे कर्मकांडांना अंधश्रद्धा म्हणवणार्‍यांना काय समजणार ? – संपादक) महिला शक्तीचा सन्मान केल्याचा आभासी देखावा उत्सवात केलेला असतो. सण-उत्सव ही धर्माची प्रतीके आहेत. जो धर्म महिलांना दुय्यम मानतो, तो धर्म महिलांचा सण-उत्सवात सन्मान कसा करेल ?

२. महिला दिवसभर कुटुंबातील सर्व कष्टाची कामे करूनही, नवरात्रीचा उपवाससुद्धा महिलांनी करायचा ! म्हणजे उपाशी राहून सर्व कामे करणे हे महिलांचे शोषण आहे. तसेच उपवास करून सर्व कामे करणे ही अंधश्रद्धा आहे, (ज्या कर्मकांडाचा महिलांना त्रास होत नाही, त्याविषयी त्या कधी चकार शब्द काढत नाहीत, असे असतांना निकम यांना कुठल्या दृष्टीने हे शोषण वाटते ? यातून त्यांना हिंदु धर्माविषयी पोटशूळ आहे, हे दिसून येते ! – संपादक)

३. नवरात्रीत महिला अनवाणी चालण्याचे व्रत घेतात. अनवाणी डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यावरून चालणे शरिरासाठी हानीकारक आहे. अनवाणी स्वच्छतागृहात गेल्याने जंतूसंसर्ग होऊ शकतो; म्हणून अनवाणी रहाणे ही अंधश्रद्धा आहे.

४. नवरात्रोत्सवात ९ रंगांची वस्त्रे परिधान करण्याचे विज्ञापन सर्व माध्यमांतून केले जाते. याला धर्माची जोड देऊन महिलांच्या मनावर बिंबवले जाते. ही व्यवसायवाढीची युक्ती आहे. महिलांनी सजग राहून या अंधश्रद्धेला बाजूला करणे आवश्यक आहे.