मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे तुकडे होतील ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना  

  • मुंबई येथील ‘दसरा मेळाव्या’त उद्धव ठाकरे यांची गर्जना !

  • कोरोनाप्रमाणे इतर महापालिकांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचीही चौकशी करा !  

मुंबई, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – मुंबईला दुसर्‍या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो कुणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करेल, त्याचे तुकडे तुकडे होतील. कोरोना काळातील घोटाळ्यांची सरकार चौकशी करत आहात, तर मग ठाणे, पुणे, नागपूर महापालिकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचीही चौकशी करा. उद्या आपले सरकार येणारच आहे. पाशवी बहुमत असलेले सरकार नको. आमच्या लोकांना त्रास देणार्‍यांना उलटे टांगू, अशी चेतावणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी येथील शिवाजी पार्कच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘दसरा मेळाव्या’त दिली. या वेळी त्यांनी सरकारच्या कामकाजावर घणाघाती टीकाही केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. ५७ वर्षे झाली, तरीही शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा आपण मोडली नाही. यापुढेही मोडणार नाही. ज्यांनी मोडता घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना मोडीत काढून आपण पुढे चाललो आहोत.

२. पी.एम्. केअर फंड घोटाळ्याचे काय झाले ? महाराष्ट्रातील किती जणांना ‘बुलेट ट्रेन’चा उपयोग होणार आहे ?

३. आम्ही घराणेशाहीची परंपरा जपणारे आहोत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. मी घराणेशाहीचा पाईक आहे. कुटुंबव्यवस्था आधी समजून घेऊन मगच हिंदुत्वाच्या गप्पा माराव्यात.

४. महापालिकेवर प्रशासक राजवट चालू आहे. पालकमंत्र्यांचे कार्यालय मुंबई महापालिकेत का ? महापालिकेच्या ऐवजी आता ‘नीती आयोग’ मुंबईचा विकास करणार आहे.

५. आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर बुडवून दाखवले. त्याची चौकशी करा. राज्यातील उद्योग बाहेर चालले आहेत. पी.एम्. केअरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे त्याचा हिशेब जनतेला द्यावा लागेल.

६. धारावी येथील प्रत्येकाला घरे मिळाली पाहिजे. त्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकाला गाळे मिळाले पाहिजेत. गिरणी कामगारांना घरे द्यावीत, तसेच वांद्रे येथील शासकीय कर्मचार्‍यांना घरे मिळाली पाहिजेत; मात्र त्यांना हे सरकार नकार देत आहे.

७. अहमदाबादमध्ये पाक खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यामुळे पाक खेळांडूना भाजपमध्ये घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्‍यांना महाराष्ट्रात ठेवायचे नाही. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे.

८. पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकर्‍यांचा दिली नाही. पीकविमा आस्थापनांना घेराव घाला. मारझोड करू नका.