शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या तरुणीची फसवणूक करणार्‍या एजन्सीविरोधात गुन्हा नोंद !

३२ लाख ४४ सहस्र रुपयांची फसवणूक

प्रतिकात्मक चित्र

डोंबिवली – शिक्षणासाठी विदेशात जायचे असल्याने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी विदेशी सेवा देणार्‍या कांदिवली येथील एजन्सीसमवेत येथील तरुणीने संपर्क साधला; पण या एजन्सीने तरुणीची ३२ लाख ४४ सहस्र रुपयांची फसवणूक केली. जेनिशा पाटील असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘माझी करिअर्स अँड ऑप्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मेहता, व्यवस्थापकीय संचालक स्टेला राकेश मेहता यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवला आहे. जेनिशा ही इंग्लडमधील लकेस्टर आणि पेस विद्यापिठात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार होती. (या एजन्सीने याआधीही अशा प्रकारे कुणाची फसवणूक केली होती का ? याची चौकशी व्हायला हवी ! – संपादक)

पाटील कुटुंबियांनी एजन्सीच्या संचालकांवर विश्वास ठेवून १२ लाख ९८ सहस्र १९ लाख ४५ सहस्र रुपये असे एकूण ३२ लाख रुपये जमा केले. ९० दिवसांचा कालावधी संपूनही कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यानंतर चौकशी केल्यावर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.

संपादकीय भूमिका :

लोकहो, लाखो रुपयांची गुंतवणूक करतांना सावधगिरी बाळगा !