पुणे शहरातील बाललैंगिक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ !

शाळांमधून धर्मशिक्षण दिल्यासच मुलांवर योग्य संस्कार होणार आहेत, हे दर्शवणारी घटना !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – शहरामध्ये गेल्या ९ मासांमध्ये बाललैंगिक शोषणाच्या ३२४ घटना घडल्या. गेल्या ६ वर्षांमध्ये १ सहस्र ५०० हून अधिक गुन्हे नोंद झाले होते; परंतु चालू वर्षामध्ये हे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे शहरातील बालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (यातून गुन्हेगारांना कुठलेही भय राहिले नसून समाजाची नैतिकता खालावल्याचे लक्षात येते. – संपादक)

अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावून देणे, पहिलीतील विद्यार्थ्याचे वरच्या वर्गातील विद्यार्थ्याने लैंगिक शोषण करणे, अल्पवयीन मुलीला भ्रमणभाषवर अश्लील चित्रफित दाखवणे, महाविद्यालयीन तरुणीचा पोलीस कर्मचार्‍यांकडून विनयभंग, शारीरिक शिक्षण देणार्‍या शिक्षकांकडून मुलींना स्पर्श करणे आदी घटनांतून मुली सुरक्षित नसल्याचे लक्षात येते. लहान मुला-मुलींवर अत्याचार करणारे हे ओळखीचे, नातेवाईक असल्याने अनेक प्रकार उघडकीस येत नाहीत, असे पोलिसांचे निरीक्षण आहे. (असे असेल तर हे गंभीर आणि संतापजनक आहे. पोलिसांनी यावर उपाययोजना काढणे अपेक्षित आहे ! – संपादक)

अनेक ठिकाणी ‘पोक्सो’ (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) कायद्याच्या कार्यवाहीसाठी समिती नाही. (स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अनेक ठिकाणी कायद्याच्या कार्यवाहीसाठी समिती नसणे, हे संतापजनक आहे. – संपादक)

‘भरोसा विभाग’ऐवजी प्रत्येक पोलीस ठाण्यात बालकल्याण अधिकारी नेमला पाहिजे, असे मत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांनी नोंदवले आहे.