रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

१. आध्यात्मिक त्रास अल्प होणे

‘नवरात्रीच्या कालावधीत ७.१०.२०१९ या दिवशी चंडीयाग झाला. त्या वेळी मी पूर्णवेळ यज्ञाला बसले होते. तेव्हा मला होणारा आध्यात्मिक त्रास अल्प झाला.

२. देवीने वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर बळ देणे

अ. यज्ञ चालू असतांना ‘देवीने वाईट शक्तींशी लढण्यासाठी सूक्ष्मातून शक्ती दिली. त्यामुळेच मी त्रासाशी लढू शकत आहे’, असे मला जाणवले.

आ. माझ्या मनात ‘आता मी वाईट शक्तींच्या त्रासाला बळी न पडता त्यांच्याशी लढू शकेन’, असा विचार आला आणि ‘माझी साधना अन् माझे आयुष्य यांमध्ये येणारे अडथळे दूर होतील’, असे मला जाणवले.

३. यज्ञकुंडात कोहळ्यांचा बळी देतांना साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्ती कोहळ्यात आकृष्ट होत असल्याचे जाणवणे

यज्ञाच्या शेवटी कोहळ्यांचा बळी देण्यात आला. तेव्हा कोहळा फोडून त्याचे दोन तुकडे करण्यात आले आणि त्याच्या पृष्ठभागावर कुंकू घालण्यात आले. त्या वेळी ‘माझ्या डोळ्यांमधून सरडे आणि पालींप्रमाणे दिसणारे प्राणी त्या कोहळ्यात आकृष्ट होत आहेत’, असे मला दिसले. नंतर असंख्य संख्येने वेगवेगळ्या रूपातील सरपटणारे प्राणी कोहळ्याच्या दिशेने आकृष्ट होतांना दिसले, तसेच ‘साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तीच त्या कोहळ्यात आकृष्ट होत आहेत’, असे मला जाणवले.’

– एक साधिका , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०१९)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक