काळजीवाहू जपान !

जपानचा राष्ट्रध्वज

जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेल्या बाँब आक्रमणात सर्वकाही उद्ध्वस्त होऊनही अवघ्या काही वर्षांत जपान स्वत:ला स्थिरस्थावर करून तितक्याच धाडसाने पुन्हा उभा राहिला. जपानी नागरिकांची परिश्रम घेण्याची सिद्धताच देशाला प्रगतीपथावर नेते, हे सर्वांना ठाऊक आहे. याचेच आणखी एक उदाहरण नुकतेच वाचनात आले. जपानमध्ये एक ट्रेन बंद करण्यात आली; पण केवळ एका प्रवाशासाठी ती ट्रेन दिवसातून २ फेर्‍या मारत होती. तो प्रवासी म्हणजे कुणी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी नव्हता, तर ती होती शाळेत शिकणारी एक मुलगी. त्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी नसल्याने ट्रेन बंद करण्यात येणार होती; पण जपान शासनाने केवळ त्या शालेय विद्यार्थिनीसाठी ट्रेन चालू ठेवली आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणजे ती पदवीधर झाल्यावर ट्रेन बंद करण्यात आली. इतका मोठा खटाटोप केवळ जपानच करू शकतो. जपानमध्ये शिक्षणाला सर्वाेत्तम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संदर्भात अशा स्वरूपाचा विचार आणि कृतीही केली जाते. अर्थात् त्यामुळेच तेथे साक्षरतेचे प्रमाणही अधिक आहे. जपानमध्ये ना कुणी अशा गोष्टींवर आक्षेप घेत, ना कुणी त्याला विरोध करत ! जपानमध्ये प्रत्येक नागरिकाप्रती आदराची भावना बाळगली जाते. त्यामुळेच तो देश आज प्रगतीपथावर आहे. भारतात जर अशी परिस्थिती निर्माण झाली असती, तर त्या विद्यार्थिनीलाच शाळा पालटण्याचा सल्ला देण्यात आला असता किंवा तिला वाहतुकीच्या अन्य पर्यायांचा मार्ग स्वीकारण्याविषयी सांगितले असते किंवा ट्रेनच्या अनावश्यक खर्चाच्या संदर्भात चर्चा झाली असती !

भारतात शिक्षणाला इतके महत्त्व दिले जात नाही. विद्यार्थ्यांची पटसंख्या अगदीच अल्प असेल किंवा शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडत असतील, तर लगेचच त्या बंद केल्या जातात. विद्यार्थ्यांची संख्या अल्प का झाली ? याचा विचार किंवा उपाययोजनांच्या दृष्टीने अभ्यास केला जात नाही. परिणामी मराठी भाषिक शाळा प्रमाणाच्या बाहेर बंद पडत आहेत. याकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष केले होत आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यांच्याप्रती प्रशासन आणि शासन यांच्यात संवेदनशीलता कधी निर्माण होणार ? जपानमधील विद्यार्थिनीप्रमाणे भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी सरकारने घ्यायला हवी. ‘आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे’, ही संवेदनशीलता प्रत्येक स्तरावर बाळगली गेली, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.