इस्रायली नागरिकांची विजिगीषु वृत्ती आणि ते करत असलेले साहाय्यकार्य

इस्रायलने ठेवला जगासमोर आदर्श !

इस्रायलचा बाणेदारपणा, शिस्त आणि सुशासन यांचे कौतुक जगभरात केले जाते. आता ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायल पुन्हा उभा रहाण्यासाठी प्रयत्न करत आहे. हमासच्या आतंकवादी आक्रमणात इस्रायलची २० गावे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. ती गावे पुन्हा उभी करणे, तेथील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, हे काम आता इस्रायलच्या उर्वरित नागरिकांनी शिरावर घेतले आहे. ज्याप्रमाणे हमासने केलेल्या आक्रमणात मृत्यू पडलेल्या इस्रायली नागरिकांचे व्हिडिओ समोर आले, त्याचप्रमाणे तेथील साहाय्यकार्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणार्‍या एका ध्वनीचित्रफितीमध्ये इस्रायली नागरिकाने तेथे साहाय्यकार्य कशा प्रकारे चालू आहे, याविषयी सांगितले आहे.

कशा प्रकारे चालू आहे साहाय्यकार्य ?

१. या साहाय्यकार्यात शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. देशभरातून नागरिकांनी अनेक ट्रक भरून साहित्य पाठवले आहे. ते उतरवण्याचे काम एका मोठ्या परिसरातील सभागृहात चालू आहे. त्या सभागृहात पहिल्या टप्प्यात कपडे, लहान मुलांची खेळणी, लहान मुलांचे डायपर, लहान मुलांचे खाद्यपदार्थ, चप्पल, बूट, अंथरूणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तू नागरिकांनी आक्रमणात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पाठवल्या आहेत. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून खोक्यांमध्ये भरण्याचे काम चालू आहे.

२. दुसर्‍या टप्प्यात त्या वस्तू आवश्यकतेनुसार आणि ज्या ठिकाणी पाठवायच्या आहेत, त्यानुसार विभागल्या जात आहेत.

३. तिथे एक समन्वय केंद्रही स्थापन करण्यात आले आहे. त्या कक्षाद्वारे हरवलेल्या शेकडो नागरिकांना शोधण्याचे काम चालू आहे.

आमचे नागरिक सापडत नाहीत, तोपर्यंत आम्ही गाझातील आतंकवाद्यांचा शोध घेऊ ! – इस्रायली नागरिकाची विजिगीषु वृत्ती

या ध्वनीचित्रफितीमध्ये असलेल्या एका इस्रायली नागरिकाने हमासला चेतावणी देणारे खडे बोल सुनावले आहेत. तो म्हणतो, ‘‘तुम्ही चुकीचा शत्रू निवडला आहे. हमासचे आतंकवादी आता मारले तरी जातील किंवा कारागृहात असतील. जोपर्यंत आमचा एक एक नागरिक सापडत नाही, तोपर्यंत आम्ही गाझामधील एका एका इमारतीत जाऊन आतंकवाद्यांचा शोध घेऊ. तुम्ही केवळ एका देशाविरुद्ध युद्ध पुकारलेले नाही, तर या देशाच्या एकेका नागरिकाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारले आहे.’’

(असे भारतात कधी झाल्याचे ऐकले आहे का ? भारतियांनी यातून बोध घेऊन शत्रूराष्ट्रांविरुद्ध असा स्वराष्ट्राभिमान दाखवायला हवा आणि आक्रमण केलेल्या भागातील नागरिकांसाठी अशा प्रकारे साहाय्यकार्य करायला हवे. भारतीय जर अशा प्रकारे संघटित झाले, तर देशांतर्गत आणि बाहेर असलेले शत्रू यांचा निःपात होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक)