भारतीय खेळांविषयी जागृती हवी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आले होते. या अधिवेशनात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि प्रथितयश व्यक्ती उपस्थित होत्या. मुंबईमध्ये प्रथमच या अधिवेशनाचे आयोजन होत असून ८० देशांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. खेळाशी संबंधित विषयांमध्ये पंतप्रधान मोदी स्वत:हून पुढाकार घेऊन सहभागी होत आहेत, ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण १०७ पदके जिंकली आहेत. त्यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदके जिंकली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदके आणि त्यातही सुवर्णपदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. भारतियांनी तिरंदाजी आणि नेमबाजी या प्रकारांत अधिक प्रमाणात सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यासह हॉकी, कबड्डी, भालाफेक यांमध्येही सुवर्णपदक मिळवलेले आहे. म्हणजेच भारतीय खेळांत पदके मिळवण्याची संख्या अधिक आहे. भारताने ऑलिंपिकसह अन्य जागतिक स्पर्धेतील खेळांमध्ये भारताला अधिक प्रमाणात पदके मिळण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. भारताला अनेक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांविना किंवा सुवर्णपदकांविना रहावे लागले आहे. एखादे कांस्यपदक मिळाले, तरी भारतीय त्यात समाधान मानत आणि त्याच वेळी अन्य देशांच्या पदतालिकेत पाहिले, तर अमेरिका, रशिया यांच्यासह चीन पदकांमध्ये पुष्कळ वरचा पल्ला गाठत असे. इतरांची कामगिरी पहाण्यावाचून कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या भारताला गत्यंतर नसे.

भारतीय खेळांकडे दुर्लक्ष नको !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य क्षेत्रांसह भारताच्या या दुर्लक्षित क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्यास प्रारंभ केला. गत ऑलिंपिक स्पर्धेत यश मिळालेल्या आणि न मिळालेल्या अशा सर्वच खेळाडूंची त्यांनी भेट घेतली. त्यांचे मनोगत जाणून घेऊन त्यांना वेळ दिला आणि प्रोत्साहन दिले. पंतप्रधानांच्या या प्रोत्साहनाने सर्वच खेळाडू भारावून गेले आणि अनेकांनी पुढील वेळी चांगली कामगिरी करण्याचा निश्‍चय बोलून दाखवला. त्याचीच परिणती या आशियाई खेळांमधील मोठ्या यशामध्ये झाली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. भारतामध्ये पूर्वापार मल्लयुद्ध, तिरंदाजी, गदायुद्ध असे विविध क्रीडा प्रकार अस्तित्वात होते. त्यानंतरच्या काळात खो-खो, कबड्डी, मल्लखांब इत्यादींची भर पडली. भारताने हॉकीमध्ये अद्यापपर्यंत ८ सुवर्णपदके जिंकली आहेत. म्हणजे एकूण १३४ सामन्यांमध्ये ८३ वेळा विजय मिळवला आहे. असे असले, तरी किती भारतियांना हॉकीतील खेळाडूंची नावे ठाऊक आहेत ? म्हणजे देशासाठी ज्यांनी एवढी भरीव सांघिक कामगिरी केली, त्यांना तेवढी प्रसिद्धी अथवा सन्मान मिळालेला नाही. अ‍ॅथलेट प्रकारात नीरज चोप्रा याने वैयक्तिक सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ते त्याने भालाफेक आणि अ‍ॅथलेट प्रकारात पहिल्यांदाच मिळवलेले असल्याने ते लक्षात राहील, जसे पी.टी. उषा, पी.व्ही. सिंधु, अभिनव बिंद्रा यांनी त्यांच्या क्षेत्रात मिळवले आहे.

भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे, असे असूनही अन्य खेळांना न्याय न मिळणे, आर्थिक अडचणींमुळे शहराच्या ठिकाणी असलेल्या चांगल्या सुविधा उपलब्ध न होणे, गरीब घरातील खेळाडूंना असलेली पोषक आहाराची अडचण, अशा अनेक अडचणी आहेत. विशेषत: भारतीय खेळांना न्याय मिळणे आवश्यक आहे. भारताची लोकसंख्या अधिक असल्याने अंगभूत कौशल्य असलेल्या काही खेळाडूंना संधी मिळण्यात अडचण येऊ शकते. हे लक्षात घेऊन भारतात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक खेळांच्या स्पर्धा ठेवून खेळाडूंना चमकण्याची संधी मिळणे आवश्यक ठरते. शालेय जीवनात सर्वसाधारण १ घंटा खेळासाठी वर्ग असतो. काहीच जणांना आंतरशालेय, जिल्हा या स्तरांवर खेळण्याची संधी मिळते. खेळांच्या विविध संधी उपलब्ध आहेत, याची माहितीही विद्यार्थ्यांना नसते. शालेय जीवनापासूनच ही जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

क्रिकेटचे महत्त्व अल्प करावे !

भारतात गल्लीबोळात क्रिकेटचे वेड आहे. क्रिकेटवरच अधिक लक्ष देणे, त्यांच्या विविध सामन्यांचे आयोजन करणे, खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देणे, खेळांडूंची विज्ञापने असणे, क्रिकेटशी संबंधित व्यक्तींना अनेक कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे इत्यादी केले जाते. त्यात आय.पी.एल्. सारखे सामने खेळवून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. या सर्व प्रकारांमुळे भरपूर पैसे, प्रसिद्धी मिळवून देणारा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिले जाते आणि साहजिकच खेळाडू यामध्ये नशिब आजमवण्यासाठी कष्ट घेतो. केवळ १० ते १२ देशांमध्ये खेळल्या जाणार्‍या विश्‍वकप खेळाचा गवगवा होतो. क्रिकेटला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि त्याचा उद्गाता इंग्लंड यांच्या व्यतिरिक्त अनेक विकसित देशांनी नाकारले आहे. त्यांचे कारण काही असले, तरी या खेळात पूर्ण दिवस खेळाडूंसह पहाणारे गुंतलेले रहातात. परिणामी कोट्यवधी घंटे मनुष्यतास वाया जातात. क्रिकेटमध्ये विश्‍वकप जिंकण्यात भारत २ वेळा यशस्वी झाला आहे. असे असतांना केवळ खोर्‍याने पैसे मिळतात; म्हणून क्रिकेटला एवढे महत्त्व का दिले जात आहे ? पाश्‍चात्त्य देशांनी फूटबॉल आणि हॉकी स्वीकारला आहे. हे खेळ २ घंट्यांमध्ये पूर्ण होतात. क्रिकेटमध्ये अनेक सट्टेबाज, कुख्यात गुंड त्यांचे पैसे गुंतवत असतात. कोट्यवधींचे सट्टे लागतात. सामन्यातील निकाल आधीच ठरवण्याची (मॅच फिक्सिंगची) अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. असे असतांना क्रिकेटचा एवढा गवगवा करणे उचित आहे का ? क्रिकेटचे महत्त्व उण्यावण्यासह अनेक भारतीय खेळांचे महत्त्व वाढवणे, त्यांचा दर्जा वाढवणे, त्यांच्यासाठी सोयीसुविधा वाढवणे, त्यांतील यशस्वी खेळाडूंना विविध माध्यमांतून जनतेसमोर आणणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळांची धोरणे ठरवणार्‍यांनी प्रयत्न करून भारतीय खेळांना सोन्याचे दिवस मिळवून दिले पाहिजेत.