‘आमच्या घरी एक चांगला बैल होता. तो दैवी बैल असून हिमालयातील होता’, हे आम्हाला आमच्या जीवनात गुरु आल्यानंतर कळले. प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे आमच्या घरी असणार्या बैलाचे दैवी गुण येथे दिले आहेत.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे बैलाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये कळणे
‘जून २०२१ मध्ये मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दौर्यावर होतो. आम्ही रामनाथी (गोवा) येथून तिरुवण्णामलाई येथे गेलो होतो. पुष्कळ प्रवास झाल्यामुळे मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या चरणांचे बिंदूदाबन करत होतो. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुझ्या हातामध्ये बैलाचा स्पर्श आणि शक्ती जाणवते.’’ तेव्हा मला आश्चर्य वाटले; कारण मी किंवा आमच्या घरच्यांनी त्यांना आमच्या बैलाविषयी काही सांगितले नव्हते. त्यानंतर मी त्यांना आमच्या बैलाविषयी सर्व माहिती सांगितली. तेव्हा आमची पुष्कळ भावजागृती झाली. त्या मला म्हणाल्या, ‘‘तू त्या बैलाची जी सेवा केलीस, त्याने तुला मोठा आशीर्वाद दिला आहे. तुला साधनेत पूर्णवेळ करून त्याने त्याची सेवा पूर्ण करून तो परत हिमालयात गेला. देव तुला दौर्यात सर्वप्रथम तिरुवण्णामलाई या ठिकाणी घेऊन आला. हे स्थान साक्षात् शिवाचे दैवी स्थान आहे. तो तिरुवण्णामलईचा डोंगर साक्षात् भू-कैलास असून हा डोंगर म्हणजे साक्षात् शिव आहे आणि तुला त्याचे प्रथम दर्शन करून हा तुझा दैवी दौरा चालू होत आहे. ही त्या बैलाची कृपा आहे.’’ त्यानंतर मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना बैलाची पुढील वैशिष्ट्ये सांगितली.
२. शांत प्रकृती
मी लहान असल्यापासून आमच्या घरी एक बैल होता. त्याचे नाव इंग्राजा होते. माझ्या वडिलांच्या आजोळच्या (वडिलांच्या आईच्या आईकडून) घरून तो लहान असतांना आणला होता. त्याला माझ्या वडिलांनी शेतीची कामे शिकवली आणि त्याची पुष्कळ काळजी घेतली. तो कुणालाही मारायचा नाही. त्याला सकाळी आम्ही घरातील कुणीही शेतात सोडून यायचो. नांगरणीचे काम संपल्यावर तो स्वतः घरी यायचा. तो इतरांच्या शेतात खाण्यासाठी जात नसे. घरी आल्यावर आम्ही त्याला पाणी आणि चारा द्यायचो. जेवढे खायला दिले, तेवढे खाऊन तो शांत बसायचा. त्यानंतर आम्ही त्याला बांधायचो.
३. पुष्कळ कष्टाळू
आमचा बैल पुष्कळ कष्टाळू होता. बैलाचे आयुष्य साधारणपणे १६ वर्षे असते; पण आमचा बैल २४ वर्षे जगला. त्याने २० वर्षे आमच्या घरी शेतीची कामे केली. काम करतांना थकल्यास तो मध्येच बसायचा आणि परत काम चालू करायचा. पूर्ण आयुष्यात त्याने कुणाला मारले नाही. तो शेतात दिवसभर काम करायचा.
४. प्रेमळ
वर्ष १९९८ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर बैल रडला होता. वडील गेल्यानंतर साधारण १५ – २० दिवस त्याच्या डोळ्यांत सतत पाणी येत होते. दोघांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. त्यानंतर त्याने साधारण १५ वर्षे घरच्या शेतात काम केले. त्याच्या कष्टावर आमची शेती चालत होती. आम्ही पोळ्याला त्याला सजवायचो; पण त्याला ते आवडायचे नाही. त्याला साधी रहाणी आवडायची. त्याला कुणी बळजबरीने सजवत असेल, तर तो अजिबात शांत उभा रहायचा नाही. त्याला जसे आहे, तसे रहायला आवडायचे. माझी आई नेहमी म्हणायची, ‘‘हा वर्षभर शांत असतो; पण याला याच दिवशी काय होते ? देव जाणे.’’ त्याचा रंग पाठ आणि पोटाकडून काळा होता, तर तोंड अन् गळा यांकडून पांढरा होता.
५. आजारी पडल्यावर गावातील लोकांनी त्याला विकण्यास सांगणे; मात्र त्याला सर्वांनी पुष्कळ प्रेमाने सांभाळणे
शेवटची ४ वर्षे आम्ही त्याला घरीच ठेवले. त्याचे दात पडल्यामुळे त्याला खाता यायचे नाही. त्याला आम्ही मऊ खायला द्यायचो. त्या वेळी त्याला हिरवी मक्याची पाने आणि ज्वारीच्या कडब्याचे छोटे छोटे तुकडे करून द्यायचो. त्याची स्थिती पाहून आम्हाला बरेच लोक सांगायचे, ‘‘आता हा काही कामाचा राहिला नाही. त्याला विकून टाका.’’ आमच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आणि आदर होता. वडिलांचे त्याच्यावर पुष्कळ प्रेम होते. त्यामुळे आम्ही ठरवले होते की, मेल्यानंतर त्याला आपल्याच शेतात मीठ आणि कापड घालून पुरायचे.
६. बैलाची सर्व प्रकारची सेवा करणे, तसेच बैलाशी बोलणे
वर्ष २०१४ मध्ये मी पूर्णवेळ साधना करण्याचे नियोजन करत होतो. त्या वेळी मी बैलाची सर्व सेवा करत होतो. त्याला अंगात शक्ती नसल्यामुळे उठता यायचे नाही. बराच वेळ बसल्यामुळे त्याच्या मांडीला जखम व्हायची. त्यामुळे मी त्याला सकाळी उठायला सांगायचो आणि त्याला उठतांना आधार द्यायचो. काही वेळ गेल्यानंतर परत बसवतांना त्याला आधार द्यावा लागायचा. असे साधारण दिवसातून ३ – ४ वेळा करत असे.
मी त्याला बसल्या जागी पिण्यासाठी पाणी आणि खायला देत असे. संध्याकाळी त्याला उठवून उभा करत असे आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याला खाली बसवत असे. त्याला खडे टोचू नये; म्हणून मी त्या ठिकाणची सतत स्वच्छता करत असे, तसेच मी त्याच्या अंगाखाली जाड कापड येईल, अशा तर्हेने कापड टाकायचो.
७. बैलाशी बोलल्यावर त्याला ते सर्व कळत असल्याचे जाणवणे
मी त्याच्याशी बोललेले त्याला सर्व कळायचे. कधी कधी त्याला उभे रहायचे नसेल, तर तो अजिबात हलत नसे. पूर्ण अंग खाली टाकून आपण झोपतो, तसा झोपत असे. त्या वेळी माझ्या लक्षात यायचे की, याला उठावेसे वाटत नाही. मग काही वेळाने ‘उठायचे का ?’, असे त्याला विचारले की, तो हालचाल करायला लागायचा आणि मग मी त्याला उठवून उभा करायचो. अशा पद्धतीने आमच्या दोघांमध्ये बोलणे होत असे. त्याची अशी सेवा मी साधारण ६ मास केली.
८. पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर ‘बैलाची सेवा कोण करणार ?’, याची आईला काळजी वाटणे
या कालावधीमध्ये मला सनातन संस्थेविषयी चांगली माहिती झाली होती आणि संस्थेचे कार्य पुष्कळ आवडले असल्यामुळे मी पूर्णवेळ साधना करण्याचा विचार केला होता. हा विचार करत असतांना आईला (श्रीमती इंदुबाई भुकन यांना) ‘वाल्मिक पूर्णवेळ झाल्यावर बैलाची सेवा कोण करणार ?’, अशी चिंता होती; कारण रामेश्वरदादा नोकरीसाठी बाहेर गावी होता. त्या वेळी मी आईला म्हणायचो, ‘‘देव काहीतरी साहाय्य करील.’’ मी पूर्णवेळ साधना करण्याचा अंतिम निर्णय घेतला होता.
९. बैलाची सेवा सोडून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर बैलाने देह ठेवणे
मी ‘सनातनच्या गोवा येथील आश्रमात जाऊया’, असे ठरवले आणि दिनांक अंतिम झाला. ‘हे सर्व बैलाला कळले असावे’, असे मला वाटले. तेव्हा त्याने मी जाण्याच्या एक आठवड्यापूर्वी, म्हणजे ४.१२.२०१४ या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर देह ठेवला. या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी, मासातील शिवरात्री आणि गुरुवार होता. अशा शुभदिनी त्याने देह ठेवला. त्याला आम्ही आमच्या शेतात खड्डा खणून आणि त्याची पूजा करून त्यावर पांढरे कापड अन् मीठ घालून पुरले. त्या वेळी बैलाने माझा पूर्णवेळ साधना करण्याचा मार्ग मोकळा केला. आम्हाला सर्वांना पुष्कळ वाईट वाटले. त्या वेळी मला ‘घरातील कुणी जवळची व्यक्ती गेली आहे’, असे सतत वाटायचे. तो बैल म्हणजे घरातील एक सदस्यच होता. त्याची सेवा मी पुष्कळ जवळून केली होती. त्यामुळे मला पुष्कळ रडू यायचे. आजही मला बैलाची आठवण आली, तरी भावजागृती होते.
१०. ‘कुटुंबियांनी बैलाची मनोभावे सेवा केल्यामुळे त्याने कुटुंबियांना आशीर्वाद देऊन साधनेत साहाय्य केले’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे
वरील सर्व विषय श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तो एक शिवभक्त होता. तुमच्यासारख्या सात्त्विक कुटुंबात येऊन त्याने तुमची सेवा केली. तू त्याची सेवा केल्यामुळे त्याने शेवटी तुला फार मोठा आशीर्वाद दिला आहे. तो तुझ्या हाताकडे पाहून जाणवतो. तुम्हा कुटुंबियांना त्याला साधनेला लावायचे होते. त्याने त्याचे कार्य पूर्ण केले आणि मग देह ठेवला. कुटुंबातील सर्वांनी त्याची सेवा पुष्कळ मनोभावे केली होती.’’
११. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी बैलाचा अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी जाऊन अभिषेक करणे आणि त्यांना सूक्ष्मातून एक नंदी वर जातांना दिसणे
आम्ही महाराष्ट्र दौरा करत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘तुम्ही शेतामध्ये ज्या ठिकाणी त्या बैलाला पुरले आहे, त्या स्थानाचे मला दर्शन घ्यायचे आहे. एके दिवशी आम्ही त्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो. त्यांनी त्या ठिकाणी अभिषेक करून प्रसाद ठेवला. हे सर्व चालू असतांना आकाशामध्ये ढग जमा झाले आणि पूजा संपल्यावर लगेच पाऊस पडला. वरुणदेवाने त्या ठिकाणी येऊन आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. हे सर्व पाहून आम्हाला आनंद झाला आणि आमची भावजागृती झाली. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सूक्ष्मातून एक नंदी (बैल) वर जातांना दिसला. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर समजले की, ‘संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या मानाच्या बैलाने आज देहत्याग केला आहे.’ बैलाचा महिमा गुरूंच्या कृपेमुळे लक्षात आला. आजही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ मला सांगत असतात, ‘‘तू नियमित त्या बैलाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत रहा. त्याच्या कृपेमुळे तुला गुरुदेव मिळाले आहेत.’’
‘प.पू. गुरुदेव, तुमच्या अनंत कृपेमुळे आम्हाला अशा बैलाची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेमुळे त्या बैलाचे देवत्व अनुभवायला मिळाले. ‘आपल्या जवळ कितीही मूल्यवान वस्तू असली, तरी तिला ओळखायला गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात आवश्यक आहे’, हे तुम्ही मला शिकवले. तुम्हा गुरूंची अशीच कृपादृष्टी आम्हा सर्व साधकांवर राहो, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना.’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (८.९.२०२३)
देहत्याग करून ८ वर्षे होऊनही बैलाच्या माळेत पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवणे
आम्ही प्रत्येक पोळ्याला (बैलांच्या सणाला) आमच्या बैलाच्या गळ्यामध्ये घुंगराची माळ घालायचो. आम्ही त्याला ‘घागर माळ’ म्हणतो. वर्षातून केवळ एकदा आम्ही त्याला ती घालायचो. त्या माळेला छोटे छोटे घुंगरू असून बैल चालायला लागला की, त्याचा छान आवाज यायचा. आम्ही त्याची आठवण म्हणून आमच्याकडे ती माळ जपून ठेवली आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) काकूंना माळेचे छायाचित्र पाठवल्यावर त्यांनी त्याचे ‘यू.ए.एस्.’ घेण्यास सांगितले होते. १४.९.२०२३ या दिवशी त्याचे ‘यू.ए.एस्.’ घेतल्यानंतर त्या माळेमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले आणि तिची प्रभावळ ७२.४० मीटर आली. बैलाने देहत्याग करून ८ वर्षे झाली आहेत; पण ‘त्याने वापरलेल्या माळेमध्ये इतके चैतन्य आहे’, हे शिकायला मिळाले.
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (८.९.२०२३)
श्रीमती इंदुबाई भुकन यांना स्वप्न पडून स्वप्नात शिवाच्या मंदिरातील नंदीने आई-वडिलांच्या जवळ येऊन त्यांना आशीर्वाद देणार असल्याचे सांगणे
‘वर्ष १९९८ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर साधारण २ वर्षांनी आईला (श्रीमती इंदुबाई भुकन (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे)) बैलाविषयी स्वप्न पडले होते. श्रीगोंदा गावाच्या बाहेर साळंदेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला शिवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक काळ्या नंदीची मूर्ती आहे. माझे आई-वडील त्या मंदिराच्या समोर उभे होते. तेवढ्यात शिवाच्या समोरचा नंदी आई-वडिलांच्या जवळ येऊन म्हणाला, ‘तुम्हाला मला आशीर्वाद द्यायचा आहे.’ असे बोलून त्याने हाताची मूठ बांधून हात पुढे केला. तेव्हा आई माझ्या वडिलांना म्हणाली, ‘‘तुम्ही तो प्रसादरूपी आशीर्वाद घ्या.’’ त्यावर वडील आईला म्हणाले, ‘‘तो तूच घे. तुला उपयोगी होईल.’’ मग आईने पदर पुढे करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि गाठ मारून स्वतःकडे ठेवला. त्या वेळी वडील तो प्रसाद स्वतःकडे घेऊ शकत नव्हते; कारण त्यांनी देह ठेवला होता. ‘आईला मिळालेल्या आशीर्वादामुळे पुढे आम्हा सर्वांना बैलाची सेवा मिळून त्याचे आशीर्वाद मिळाले’, असे मला वाटले. आईला स्वप्नात दिसलेले मंदिर आम्ही कधीही पाहिले नव्हते. काही वर्षांनी आई त्या गावात गेल्यावर तेथील मंदिरात दर्शनाला गेली. तेव्हा ‘आईला जे मंदिर स्वप्नात दिसले होते, ते त्याच पद्धतीचे होते’, असे लक्षात आले. आई तेथील नंदीचे दर्शन घेऊन आमच्या गावी परत आली.’
– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (८.९.२०२३)