जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्ननिष्ठांची पोलिसांकडे मागणी

  • सनातन धर्माविषयी प्रक्षोभक विधान केल्याचे प्रकरण

  • चिपळूण पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार आणि निवेदन सादर !

पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी

चिपळूण, १३ ऑक्टोबर (वार्ता.) – आज भारतात उघडपणे सनातन हिंदु धर्म संपवण्याची भाषा बोलली जात आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्या धर्माची तुलना डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, एड्स यांच्याशी करून तो संपवण्याचे चिथावणीखोर वक्तव्य उदयनिधी स्टॅलीनसारखे नेते करत आहेत. त्याचीच ‘री’ ओढून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे’ आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी ‘सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा आहे’, अशी प्रक्षोभक वक्तव्ये उघडपणे केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘समाजात कुणीही द्वेष पसरवून जर प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर सरकारने स्वतः नोंद घेऊन गुन्हा नोंद केला पाहिजे’, असा आदेश दिला आहे; मात्र जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्याविरुद्ध आतापर्यंत कुठलीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे युवा सेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी चिपळूण पोलीस ठाण्यात आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली.

आव्हाड

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्याकडूनही पोलिसांना निवेदन !

आव्हाड आणि वागळे यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांच्या विरोधात चिपळूण येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनीही एकत्रित येऊन १२ ऑक्टोबर या दिवशी चिपळूण पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात ‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ, २९८, ५०५ आणि आय.टी. कायदा, यांनुसार त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी याच विषयावरून तक्रार प्रविष्ट करणारे निहार कोवळे यांना पाठिंबाही दिला.

गुन्हे नोंदवा, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करू ! – हिंदुत्वनिष्ठांचा पवित्रा

या वेळी हिंदुत्वनिष्ठ म्हणाले, ‘‘आता राज्यातील नेते आणि पत्रकार हेही सनातन धर्माविरुद्ध बोलत आहेत. उद्या गल्लीबोळात त्यांचे समर्थक अशी वक्तव्ये करतील. मग समजा यातून हिंदूंचा उद्रेक झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? त्यामुळे कायदेशीर तरतूद आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, यांनुसार आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवलाच पाहिजे. तसे न झाल्यास पोलीसयंत्रणेने गुन्हा न नोंदवण्यामागे लिखित कारणे स्वरूपात आम्हाला द्यावीत. मग पुढील कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने आम्हीही निर्णय घेऊ.’’
या वेळी निहार कोवळ यांची तक्रार, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन स्वीकारणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून तुम्हाला निर्णय कळवू’, असे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले.

या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. आशिष खातू, जिल्हा सरचिटणीस श्री. विनोद भुरण, शहराध्यक्ष श्री. श्रीराम शिंदे, मनसेचे शहर अध्यक्ष श्री. अभिनव भुरण, भाजपचे श्री. निनाद आवटे, युवा सेनेचे श्री. ओंकार नलावडे, श्री. विनोद पिल्ले, आदित्य पेडणेकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. उदय सलागरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे आदी हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विहिंपचे पराग ओक यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक विधाने करणारे उदयनिधी स्टॅलीन, ए. राजा यांच्याविरोधात विश्व हिंदु परिषदेचे श्री. पराग ओक यांनीही १५ दिवसांपूर्वी चिपळूण पोलीस ठाण्यात वैयक्तिक तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु पोलिसांकडून ‘यावर काय कारवाई केली ?’ हे कळवण्याचे सौजन्यही दखवण्यात आले नाही.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?