पंढरपूर – ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’स १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०१४ या कालावधीत ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे दान मिळाले आहे. यात मुख्यत्वेकरून श्रींच्या चरणाजवळ ६ कोटी २५ लाख ८९ सहस्र रुपये, लाडू प्रसादातून ५ कोटी ८५ लाख २६ सहस्र रुपये, विविध देणगींतून ८ कोटी १८ लाख ९८ सहस्र रुपये यांसह अन्य यांचा समावेश आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये; म्हणून दर्शनरांगेत मॅट घालणे, विश्रांती कक्ष, आपत्कालीन द्वार, हिरकणी कक्ष, विनामूल्य अन्नछत्र, एकादशीला खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, पाणी, चहा, आरोग्य व्यवस्थेचे कक्ष असे उपक्रम मंदिर समितीने चालू केले आहेत, तसेच श्रींच्या पूजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन, नित्यपूजेत २ भाविक कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पूजा चालू केल्या असून त्याची नोंदणीसुद्धा ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.