कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा !

सातारा, १२ ऑक्‍टोबर (वार्ता.) – कोयना धरण म्‍हणजेच शिवसागर जलाशयाच्‍या परिसरात पर्यटन विकासाला चालना मिळण्‍यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘शासकीय गुपिते कायदा १९२३’मध्‍ये अंशतः पालट करण्‍यात आला आहे.

सौजन्य सह्याद्री न्यूज 

१०० वर्षांनंतर कायद्यामध्‍ये अंशतः पालट करत शिवसागर जलाशयात पर्यटनास अनुमती मिळाली आहे. कायद्यातील पालटामुळे धरणाच्‍या भिंतीपासून पुढे पश्‍चिमेला ७ किलोमीटर पर्यंतच्‍या क्षेत्राला प्रतिबंधित आणि त्‍यानंतरच्‍या २ किलोमीटरच्‍या क्षेत्राला ‘बफर झोन’ (बफर झोन म्‍हणजे येथे असे क्षेत्र की जे अन्‍य २ क्षेत्रांना वेगळे करते. वाढीव प्रतिबंधित क्षेत्र) म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यापलीकडील जलाशयाच्‍या विस्‍तीर्ण परिसरात जलपर्यटन, जलक्रीडा आणि पर्यटन करण्‍याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्व प्रशासकीय मान्‍यतांची पूर्तता केल्‍यानंतर लवकरच ‘बफर झोन’च्‍या पुढे नौकाविहारासाठी नियोजित जागा आणि सर्व सुविधा निर्माण करून प्रत्‍यक्ष पर्यटनास प्रारंभ होणार आहे.