३ गोवंशियांसह २ टेंपो पोलिसांच्या कह्यात
वैभववाडी : राधानगरी, कोल्हापूर येथे हत्येसाठी गोवंशाची अवैधरित्या वाहतूक केल्याच्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये २ स्थानिक, तर कोल्हापूर येथील दोघे यांचा समावेश आहे. तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. (नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक)
लोकमवाडी येथे ९ ऑक्टोबरच्या रात्री उभ्या असलेल्या २ टेंपोंविषयी ग्रामस्थांना संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी टेंपो तपासले असता त्यात ३ बैल आढळले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ३ बैल आणि टेंपो, असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि संशयित यांना कह्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. ‘ही गुरे तारळे (राधानगरी, कोल्हापूर) येथील मोईन नाईक यांच्याकडे हत्येसाठी घेऊन जात आहोत’, असे टेंपो चालकाने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी तात्या चोचे, तौफिक नंदकर, अल्लाउद्दीन इब्राहिम लांजेकर (सर्व रहाणार कोळपे, वैभववाडी) आणि मोईन नाईक अन् इरफान कबीर दरवेशी (दोघे रहाणार राधानगरी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.