मडगाव येथे ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ पुस्तकाचे प्रकाशन
मडगाव, ९ ऑक्टोबर (वार्ता.) : माणूस मेल्यानंतर त्याचे अस्तित्व संपते, असे म्हटले जाते; मात्र गोव्यात पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) काळात माणूस मेल्यानंतरही त्याच्याशी असलेले शत्रूत्व, क्रूरता आणि अमानुषपणा कायम असल्याचे दिसून आले. पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून बळजोरीने धर्मांतर केले, असे डॉ. भूषण भावे यांनी सांगितले.
‘संजना पब्लिकेशन’ यांच्या वतीने ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ (गोव्यात झालेले धर्मांतर – कथा आणि व्यथा) या कोकणी भाषेतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विद्यानगर येथील कोकणी भाषा मंडळाच्या सभागृहात नुकताच पार पडला. या सोहळ्यात डॉ. भूषण भावे बोलत होते. या वेळी डॉ. किरण बुडकुले, अधिवक्ता उदय भेंब्रे, के. विश्वनाथ मल्ल्या आदींची प्रमुख उपस्थिती होती. लेखक रंगा हरि यांनी मूळ मल्याळम् भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा कोकणी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक शरदचंद्र शेणै यांनी केला. के. विश्वनाथ मल्ल्या यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
डॉ. भूषण भावे पुढे म्हणाले, ‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. जातीपातीचा अपलाभ उठवण्यात आला. या काळात पूर्वजांनी चिकाटीने आपली संस्कृती जपून ठेवली. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ पुस्तकातून मिळतो.’’