वाहनांसमोरच टोमॅटो आणि कांदा फेकत शेतकर्यांच्या घोषणा !
नाशिक – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ७ ऑक्टोबर या दिवशी नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना कळवण येथील दौर्यात त्यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क आणि टोमॅटोचे घसरलेले भाव यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरच कांदा अन् टोमॅटो फेकत शेतकर्यांनी अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवला. या वेळी शेतकर्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. शेवटी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आंदोलक शेतकर्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
कळवण येथे अजितदादा गटाच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित रहाणार होते. त्यापूर्वीच ही घटना घडली. ‘कांद्यावर सरकारने लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क रहित करावे आणि शेतीमालाला हमीभाव द्यावा’, अशी मागणी आंदोलक शेतकर्यांनी केली.
संपादकीय भूमिका :शेतकर्यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |