सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधकाचे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होणे

अधिवक्ता योगेश जलतारे

१. डोळ्यांना झालेला ‘कन्जक्टिवायटीज’ या विषाणूचा संसर्ग २ दिवसांत दूर होणे

‘७.८.२०२३ या दिवशी माझ्या डोळ्यांना ‘कन्जक्टिवायटीज’ या विषाणूचा संसर्ग झाला होता, म्हणजे माझे डोळे आले होते. त्याच्या आधी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘हा संसर्ग झाला असल्यास किंवा होऊ नये’, यासाठी ७ दिवस प्रतिदिन १ घंटा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करण्यास सांगणारा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. संसर्ग झाल्याक्षणी मी तो नामजप चालू केला. त्यामुळे मला या संसर्गामुळे होणारे लाक्षणिक त्रास झाले नाहीत, उदा. डोळे चिकट होणे, पापण्या चिकटून बसणे, वेदना होणे इत्यादी. माझा त्रास केवळ डोळे लाल होणे, येथपर्यंतच सीमित राहिला. त्यानंतर तिसर्‍या दिवशी सकाळी माझ्या डोळ्यांना झालेला संसर्ग पूर्णतः दूर झाला होता.

२. भूतकाळातील कटू आठवणींमुळे होणारा त्रास दूर होणे

मागील काही वर्षांमध्ये मला भूतकाळातील काही कटू अनुभव अधूनमधून आठवून त्यांचा त्रास होत असे. मला वर्तमानकाळात रहाणे जमत नसे. त्याचा एकूणच परिणाम माझा साधनेतील निरुत्साह वाढण्यात झाला होता. मला माझ्या व्यष्टी साधनेच्या आढावासेवकांनी काही दिवस सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करून पहाण्यास सांगितले. साधारण २ मास प्रतिदिन ३० मिनिटे हा नामजप केल्याने माझा त्रास न्यून झाला. आता मला भूतकाळातील कटू आठवणींचे स्मरण क्वचित्च होते.

३. अतीविचार केल्याने होणारा अर्धशिशीचा त्रास दूर होऊन नामजपावर लक्ष केंद्रित करता येणे

मला अधूनमधून अर्धशिशीचा त्रास व्हायचा. यासाठी एका आधुनिक वैद्या साधिकेने मला सद्गुरु गाडगीळ यांनी शोधून काढलेला ‘श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करून पहाण्यास सांगितले. प्रयोग म्हणून मी हा नामजप साधारण २ मास प्रतिदिन ३० मिनिटे ते १ घंटा केला. त्यामुळे माझा अर्धशिशीचा त्रास लक्षणीय प्रमाणात न्यून झाला. माझ्यामध्ये ‘प्रसंगाचा अतीविचार करणे’, हा स्वभावदोष आहे. त्यामुळे माझ्याकडून काही प्रतिकूल प्रसंगांचा अतीविचार होऊन मला अर्धशिशीचा त्रास होत असे. आता हे लक्षात येऊन मी अतीविचार करत असल्याची मला जाणीव होत आहे आणि ते थांबवून मला नामजपावर लक्ष केंद्रित करता येत आहे.

४. उष्णतेमुळे होणारे त्रास दूर होणे

मला उष्णतेमुळे ‘पोटात आग पडणे, छातीत जळजळ होणे आणि डोळ्यांची आग होणे’, असे त्रास होत असत, तसेच मला माझ्या सहस्राराच्या ठिकाणी आम्ल (अ‍ॅसिड) ओतल्याप्रमाणे भाजत असे. त्यामुळे मला डोकेदुखीचाही त्रास होत असे. माझे तळपाय आणि तळहात यांचीही आग होत असे. हे सर्व त्रास मी सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितले. त्यांनी मला प्रतिदिन १ घंटा ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करण्यास सांगितले. त्यानंतर केवळ १५ दिवसांत माझा हा त्रास न्यून झाला.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२३)