(म्हणे) ‘आमचे राजनैतिक अधिकारी भारतात रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे !’ – पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही. आमचे राजनैतिक अधिकारी भारतात उपस्थित रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे आहे. कठीण काळातही भारतासमवेत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही अशी पावले उचलत राहू, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले आहे. (अशी कोणतेही पावले गेल्या काही दिवसांत ट्रुडो यांनी उचलेली नाहीत. त्यामुळे ट्रुडो यांचे बोलणे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ! – संपादक) भारताने त्याच्या दूतावासातील ४१ अधिकार्‍यांना कॅनडात परत जाण्यास सांगितल्याच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ट्रुडो बोलत होते. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दुसरीकडे कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, राजनैतिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारतासमवेत खासगी चर्चा करायची आहे; कारण राजनैतिक गोष्टी परस्पर संवादातून उत्तम प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. कॅनडाच्या मुत्सद्दींची सुरक्षा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

संपादकीय भूमिका

यासाठी कॅनडाने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या हवाली केले पाहिजे. तसेच तेथील खलिस्तानी चळवळ मोडून काढली पाहिजे. या दोन्ही गोष्टी ट्रुडो करू शकत नसल्याने कॅनडाच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी आवश्यकच आहे !