गंगामातेच्‍या रक्षणाचे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी !

अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गंगामातेच्‍या (गंगा नदीच्‍या) रक्षणासाठी विरोधकांच्‍या धमक्‍यांना न घाबरता नि:स्‍वार्थ भावाने अखंड कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली आहे. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता २६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या एका सत्‍संगात सर्वांना दिली. या वेळी अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांच्‍या पत्नी अधिवक्‍त्‍या (सौ.) सरिता गुप्‍ता, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्‍य समन्‍वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, सौ. प्राची जुवेकर, श्री. नीलय पाठक आणि श्री. हरिश सहाय उपस्‍थित होते. अधिवक्‍त्‍या (सौ.) सरिता गुप्‍ता यांनी गंगा नदी रक्षणाच्‍या कार्यात त्‍यांचे पती अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांना सदैव साथ दिली आहे.

अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (उजवीकडे) यांचा श्रीकृष्‍णाची प्रतिमा देऊन सत्‍कार करतांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता रामनाथी, गोवा येथे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत झालेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित होते. या वेळी त्‍यांचे ‘गंगाजी की वैज्ञानिकता एवं गंगारक्षा हेतू किये प्रयास’ (गंगा नदीची वैज्ञानिकता आणि गंगा नदीच्‍या रक्षणासाठी केलेले प्रयत्न) या विषयावर मार्गदर्शन झाले. त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनाचे सनातनच्‍या सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांनी केलेले सूक्ष्म परीक्षण सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी या कार्यक्रमात वाचून दाखवले.

क्षणचित्रे

१. अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठल्‍याची वार्ता ऐकून अधिवक्‍त्‍या (सौ.) सरिता गुप्‍ता यांचा भाव जागृत झाला.

२. अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करून त्‍यांना मानस नमस्‍कार केला.

अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांचा परिचय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता हे अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाचे ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता आहेत. गंगा नदीचे रक्षण हेच त्‍यांचे जीवनकार्य आहे. गंगा नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी गंगा नदीच्‍या किनारी औद्योगिक प्रदूषणकारी प्रकल्‍प होऊ नयेत, यासाठी ते सातत्‍याने कार्य करत आहेत, तसेच उच्‍च न्‍यायालयात या विषयावर ते न्‍यायमित्र म्‍हणजे ‘अमॅकस क्‍युरि’ आहेत. गंगा नदीच्‍या पाण्‍याच्‍या वापराने कोरोनाचा रुग्‍ण बरा होऊ शकतो, या विषयावरील संशोधन त्‍यांनी शासनाला सादर केले आहे. त्‍यांना कांची कामकोटी पीठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्‍वती यांच्‍या हस्‍ते ‘गंगा रत्न’ या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे उत्तरप्रदेश शासनाच्‍या वतीने ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.


अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना जाणवलेली आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये !

सनातनच्‍या सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना मिळणार्‍या ज्ञानाची अलौकिकता ! 

‘सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक एखादी घटना, यज्ञ-याग किंवा व्‍यक्‍ती यांचे परीक्षण करतात आणि त्‍यासंदर्भात सूक्ष्म स्‍तरावरील घडामोडी अन् ज्ञान यांविषयी अचूकपणे सांगतात. स्‍थुलातून विशेष माहिती नसतांनाही ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त सहभागी झालेल्‍या ‘काही हिंदुत्‍वनिष्‍ठांचे गुण आणि त्‍यांनी कशा प्रकारे धर्मकार्य केले’, याविषयी त्‍यांना ज्ञान प्राप्‍त झाले. एवढेच नव्‍हे, तर निष्‍काम धर्मकार्यामुळे ‘त्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांची साधना होऊन त्‍यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली आहे’, हेही त्‍यांनी अचूक ओळखले. याबद्दल सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले यांचे कौतुक करावे तेवढे थोडेे !’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.७.२०२३)

श्री. निषाद देशमुख

१. ‘अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता यांच्‍याकडे बघूनच मला पुष्‍कळ चांगले वाटले. ‘ते एक दैवी जीव आहेत’, असे मला जाणवले.

२. त्‍यांनी बोलणे चालू केल्‍यावर बर्‍याच वाईट शक्‍तींनी आक्रमणे करून अडथळे आणण्‍याचे प्रयत्न केले. त्‍यामुळे वायूमंडलातील दाबात वाढ होऊन उष्‍णता जाणवत होती.

३. त्‍यांना बघितल्‍यावर ते एका मुनी किंवा योगी यांच्‍याप्रमाणे तेजस्‍वी जाणवले. पुढे त्‍यांच्‍या भाषणातून लक्षात आले, ‘विज्ञानानुसार त्‍यांनी देवी गंगेच्‍या संदर्भात संशोधन केले आहे.’ या माध्‍यमातून त्‍यांची काळानुसार साधनाही झाली आहे.

४. अधिवक्‍ता गुप्‍ता यांचे बोलणे चालू असतांना मला सूक्ष्मातून श्री गणपति आणि श्री दत्त यांचे अस्‍तित्‍व जाणवले. त्‍यांच्‍यातील संशोधनाच्‍या तळमळीमुळे भगवान श्री गणपति आणि महागुरु भगवान दत्तात्रेय त्‍यांना सूक्ष्मातून मार्गदर्शन करतात अन् संशोधनाची प्रेरणा देतात.

५. ते संशोधनाच्‍या कार्याद्वारे ज्ञानाची उपासना करतात, तर त्‍यांनी केलेल्‍या संशोधनाच्‍या कार्याला यश मिळण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्नांतून ते कर्म-उपासना करतात. अशा प्रकारे त्‍यांची ज्ञान आणि कर्म यांच्‍या संयोगाने साधना चालू आहे.

६. अधिवक्‍ता गुप्‍ता बोलत असतांना त्‍यांच्‍या चेहर्‍यावर कोणतेही भाव नव्‍हते. ते मनातून निष्‍काम भावात असल्‍याने त्‍यांचा चेहर्‍यावर कोणतेही भाव नाहीत. ‘अशा प्रकारे निष्‍काम भावाने साधना करत असल्‍यामुळे त्‍यांची आध्‍यात्मिक उन्‍नती होत असून लवकरच ते ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठतील’, असे मला जाणवले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२३)

कु. मधुरा भिकाजी भोसले

७. ‘अधिवक्‍ता गुप्‍ता यांची गंगानदीच्‍या अतुलनीय सामर्थ्‍यावर पुष्‍कळ श्रद्धा असल्‍याचे मला जाणवले. त्‍यामुळे मला त्‍यांच्‍या देहाच्‍या भोवती निळसर पांढर्‍या रंगाच्‍या दैवी शक्‍तीचे तेजोमंडल कार्यरत असल्‍याचे जाणवले.

८. त्‍यांनी ‘गंगानदीच्‍या गुणधर्मांचे वैज्ञानिकदृष्‍ट्या किती महत्त्व आहे !’, याविषयीची संशोधनात्‍मक सूत्रे अतिशय सोप्‍या भाषेत आणि मनापासून मांडली. त्‍यामुळे त्‍यांनी मांडलेला ‘गंगानदीचे संरक्षण केले पाहिजे !’, हा विषय श्रोत्‍यांच्‍या मनावर खोलवर बिंबला.

९. अधिवक्‍ता गुप्‍ता हे निष्‍काम कर्मयोगी आहेत, म्‍हणजे ते कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावाने हिंदुत्‍वाचे कार्य करत असतात. त्‍यामुळे त्‍यांनी मांडलेला विषय ऐकून धर्मप्रेमी हिंदू प्रभावित होतात आणि ‘वैध मार्गाने गंगानदीच्‍या रक्षणाची कृती करण्‍यास सहजरित्‍या उद्युक्‍त होतात’, असे मला जाणवले.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.