जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !
जळगाव, २ ऑक्टोबर (वार्ता.) – आज हिंदू जागृत होऊन त्यांच्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहेत; पण हिंदूंकडून धर्मरक्षणासाठी दिलेल्या हाकाटीला ‘हेट स्पीच’ म्हणत हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य केले जात आहे. हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून देशभरात हिंदूंच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. याउलट काही पंथांकडून ‘सर तन से जुदा’चे आवाहन करत अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या जातात; मात्र त्यांच्याविरोधात तथाकथित ‘पुरोगामी’, ‘सेक्युलर’ किंवा ‘पीस’वाले यांनी याचिका प्रविष्ट केल्याचे दिसून येत नाही. अशा हिंदुविरोधी शक्तींचा सामना करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून हिंदूंचा दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित एकदिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनप्रसंगी बोलत होते. हे अधिवेशन १ ऑक्टोबर या दिवशी पाळधी येथील साईबाबा मंदिरात पार पडले.
अधिवेशनाचे उद़्घाटन सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव, भागवताचार्य राजीवकृष्णजी झा महाराज, अधिवक्ता भरत देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी अधिवेशनाचा उद्देश मांडला. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. भागवताचार्य राजीवजी झा महाराज यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता’, तर श्री. घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समितीची आवश्यकता’ या विषयावर उद़्बोधन केले.
दुसर्या सत्रात ‘ब्रह्मपूर येथील हिंदुविरोधी षड्यंत्र’ या विषयावर श्री. देवेंद्र मराठे यांनी, ‘सनातनविरोधी षड्यंत्र’ या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी, तर ‘लव्ह जिहाद’ची दाहकता’ या विषयावर कु. सायली पाटील यांनी संबोधित केले.
‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात श्री. कमलेश कटारिया, गीतांजली ठाकरे, सुनील घनवट सहभागी झाले होते. अधिवक्ता भरत देशमुख, पंकज पाटील, धर्मेंद्र सोनार यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
अधिवेशनास जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील २० हून अधिक संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. संपूर्ण ‘वंदे मातरम्’ने अधिवेशनाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन श्री. प्रदीप देशमुख, श्री. लोकेश महाजन यांनी केले. आभार श्री. विनोद शिंदे यांनी मानले. शेवटी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
नामजप ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकजण आपल्या स्तरावर काही ना काही प्रयत्न करत असतो. मनुष्यजन्माचे सार्थक ईश्वरप्राप्तीमध्ये आहे. ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न म्हणजे साधना ! साधना करून धर्माचरण केल्याने अनेक लाभ होतात. धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात येते. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी रहाता येते. आत्मबळ जागृत होते. ईश्वराची कृपा होते. कर्मयोग साध्य होऊन आध्यात्मिक उन्नती होते. साधनेविना धर्मक्रांतीमध्ये यश मिळत नाही. शारीरिक आणि मानसिक बळासमवेत आध्यात्मिक बळ आवश्यक आहे. या बळाच्या आधारेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपणही कुलदेवतेचा नामजप करून आपले आध्यात्मिक बळ वृद्धींगत करू शकतो. त्यामुळे नामजप ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना आहे.
मंदिर हे धर्मशिक्षणाचे केंद्र बनवायला हवे ! – देवेंद्र मराठे, ब्रह्मपूर (मध्यप्रदेश)ब्रह्मपूर येथे सध्या ३६५ मशिदी आहेत. अनेक मंदिरांचे रूपांतर मदरसा आणि मशिदी यांत झाले आहे. प्राचीन अशा श्री प्रेमचंद हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केले होते. अशा मंदिरावर हिरवे अतिक्रमण चालू आहे. याविषयी कायदेशीर लढा चालू आहे. आतापर्यंत गोरक्षकांनी गोतस्करी करणारे ५२ ट्रक पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. सातत्याने हिंदूंच्या जागरूकतेमुळे आज यात घट झालेली दिसते. हिंदूंमध्ये जागरूकता निर्माण करायची असेल, तर मंदिरांमध्ये गोशाळा आणि संस्कार केंद्र स्थापन करून मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवायला हवे. |