पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १ लाख ४६ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन !

पिंपरी (जिल्हा पुणे) – महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कार्यक्षेत्रांमध्ये विसर्जन घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद, निर्माल्य कुंड, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रे अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी १ लाख ४६ सहस्र ३८६ एवढ्या श्री गणेशमूर्ती संकलित झाल्या, तर १८२ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. (एकीकडे महानगरपालिका नदीपात्रात विसर्जन करण्‍यास बळजोरीने बंदी घालते, तर दुसरीकडे याचा अपलाभ घेत मोठ्या प्रमाणात कृत्रिम विसर्जन हौद, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्र, असे धर्मद्रोही पर्याय भाविकांवर लादून त्यांच्याकडून मूर्तीदान घेऊन अवैधपणे त्या मूर्तींच्या विक्रीचा घाट घातला जातो. त्यामुळे आतातरी भाविकांनी श्री गणेशाची होणारी विटंबना टाळण्यासाठी जागरूक व्हावे हीच अपेक्षा ! – संपादक)

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील कार्यक्षेत्रामध्ये ८ सहस्र ३५ श्री गणेशमूर्ती, तर २१ टन निर्माल्य, ‘ब’मध्ये ४७ सहस्र ७७५ श्री गणेशमूर्ती, तर ४५ टन निर्माल्य, ‘क’मध्ये १८ सहस्र ८० श्री गणेशमूर्ती, तर १९ टन निर्माल्य, ‘इ’मध्ये १८ सहस्र ५०० श्री गणेशमूर्ती, तर १४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. शहरातील विसर्जन घाटांवर पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विसर्जनास सार्वजनिक गणेश मंडळांनी साहाय्य करत कृत्रिम हौदांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनास प्राधान्य दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (दान घेतलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात. नाल्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले जाते, असे लक्षात आले आहे. मूर्तीचे दान देणाऱ्यांना हे मान्य आहे का ? – संपादक)