काही दिवसांपूर्वी मी नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात गेले होते. तिथे दर्शनासाठी बरेच लोक आले होते. त्यात तरुण मुलेमुलीही होत्या. खरेतर नाशिकचे काळाराम मंदिर हे प्रसिद्ध असून गाभार्यात चैतन्य आहे; पण आलेला समुदाय तिथे मूर्तीला पाठ करून ‘सेल्फी’ (स्वतःचे छायाचित्र स्वतः काढणे) काढण्यात मग्न होता, म्हणजे श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर राहून फक्त रामाच्या मूर्तीसमवेत ‘सेल्फी’ काढण्यास उभा राहिला असेल, अशी काहीशी परिस्थिती होती. मंदिरात अशा प्रकारे छायाचित्र काढणे, म्हणजे आपण ‘मायेतील आणि एका खोट्या जगात म्हणजे मायेत’ किंवा एका नवीनच खोट्या जगात किती गुंतत चाललो आहोत, हे दाखवणारे एक उदाहरण आहे !
हिंदु धर्मशास्त्रानुसार ‘आपण जे जगतो, आपल्या आसपास जो संसार आहे, ती माया आहे’, असे आपण म्हणतो; पण या मायेत आता जो भ्रमणभाष (मोबाईल) आलेला आहे, त्यावरून ‘सेल्फी’ काढून तो ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’ यांवर प्रसारित करणे, ‘व्हॉट्सअॅप’ला पाठवणे, थोडक्यात आपले अस्तित्व आभासी जगात सिद्ध करत रहाणे अथवा लोकांपर्यंत पोचवत रहाणे, हा अलीकडच्या काळात मोठा छंद झाला आहे ! हा जो एक नवीन अट्टहास ही पिढी करते, ते खरेतर फार केविलवाणे आहे !
लहानांपासून तरुण आणि मोठेही भ्रमणभाषमध्ये एवढे गुंतत असतील, तर त्याचे परिणाम काय होतात, हे आपल्याला पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. मुंबईच्या लोकल गाडीमध्ये कुणी प्रवास करून पहावा. एका डब्यात १०० जण बसलेले असतील, तर त्यातील ५-१० जण झोपलेले असतात. उरलेली ८५ ते ९० जण हातात भ्रमणभाष घेऊन मालिका, चित्रपट पहात असतात किंवा यूट्यूब किंवा फेसबुक आदींवर काहीतरी पहाण्यात वेळ घालवत असतात किंवा गाणी ऐकत असतात, म्हणजे माणसाचे जग ‘माणसांचे जग’ राहिलेले नसून ते ‘भ्रमणभाषचे जग’ झालेले आहे ! ‘भ्रमणभाष आपला मालक आणि भ्रमणभाषची दोरी आपल्या गळ्यात !’, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. ‘माणूस कुत्र्याला घेऊन जसा चालतो, तसा भ्रमणभाष माणसाला घेऊन चालतो’, अशीच आपल्या सर्वांची स्थिती आहे ! या परिस्थितीत आठवण येते स्वामी विवेकानंद यांची. ते म्हणाले होते, ‘तुमच्या देशातल्या तरुण पिढीच्या ओठावर कुठली गाणी आहेत ? ते मला सांगा. मी तुम्हाला तुमच्या देशाचे भविष्य सांगतो.’ आज स्वामी विवेकानंद यांनी ही परिस्थिती पाहिली असती, तर काय म्हणाले असते ? हा खरेतर एक प्रश्नच आहे !
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, गोवा.