४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला शासनाकडून अनुमती ! – आयुक्‍त राजेश नार्वेकर

नवी मुंबई महानगरपालिका कनिष्‍ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षण देणार !

आयुक्‍त राजेश नार्वेकर

नवी मुंबई,१७ सप्‍टेंबर (वार्ता.) – राज्‍यशासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेला ४ नवीन शाळांसह ५ शाळांच्‍या दर्जा वाढीला अनुमती देण्‍यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली.

राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या माध्‍यमातून गेल्‍या अनेक वर्षांपासून उत्तम पायाभूत सुविधांसह दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. त्‍यामुळे महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांचा वाढता प्रतिसाद आहे. परिणामी ज्‍या प्राथमिक शाळा आहेत, त्‍यांचा दर्जा वाढवण्‍यात यावा. त्‍यांना माध्‍यमिक शाळेपर्यंत मान्‍यता मिळावी. २ माध्‍यमिक शाळांना पुढे कनिष्‍ठ महाविद्यालय चालू करण्‍यासाठी मान्‍यता मिळावी, तसेच राज्‍य मंडळाची इंग्रजी माध्‍यमाची एक आणि सी.बी.एस्.ई. माध्‍यमाच्‍या ३ नवीन १ ली ते १० वी पर्यंतच्‍या शाळांना अनुमती मिळावी यासाठी राज्‍याच्‍या शिक्षण विभागाकडे मागील एक वर्षापासून पाठपुरावा करण्‍यात येत होता. त्‍यानुसार राज्‍यशासनाने नुकतीच संमती दिली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात या सर्व नवीन शाळा, तसेच कनिष्‍ठ महाविद्यालय चालू करण्‍यात येणार आहे, अशी माहिती आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली. वर्ष २०२३ – २४ पासून स्‍वयंअर्थसहाय्‍यित तत्त्वावर या शाळांना मान्‍यता (दर्जावाढ) देण्‍यात आली आहे.