पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३’ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. ही निवासी बैठक सर परशुराम महाविद्यालय (एस्.पी. कॉलेज) येथे पार पडेल. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या ५ सूत्रांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी १३ सप्टेंबरला दिली. रा. स्व. संघ समन्वय समितीच्या १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत होणार्या बैठकीची माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत श्री. आंबेकर बोलत होते. या परिषदेत संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते.